NTA Director General Subodh Kumar Sarkarnama
देश

NEET Paper Leak Controversy : केंद्र सरकारची मोठी कारवाई ; 'NTA' महासंचालक सुबोध कुमार यांची हकालपट्टी!

Mayur Ratnaparkhe

NEET UG Paper Leak Case Update : 'NEET' पेपर लीक आणि 'UGC-NET' परीक्षांचे पेपर लीक प्रकरणांने देशभरात खळबळ उडाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजीचे आणि संतापाचे वातावरण असून, विरोधक या मुद्य्यावरून सरकारवर सातत्याने जोरदार टीका करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता सरकारनेही कठोर पावलं उचलणं सुरू केल्याचे दिसत असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. आता त्यांच्या जागी आयएएस प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवे महासंचालक असणार आहेत.

पेपर लीक प्रकरणी सध्या देशभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. खरंतर प्रवेश परीक्षा ही भ्रष्टाचारमुक्त व्हावी यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापन करण्यात आली होती. मात्र आता एनटीए मॉडेलवरच सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, याआधी शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, परीक्षा प्रक्रियेची उच्च पातळीची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल. यासोबतच हे प्रकरण सखोल तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांचा रोष आणि विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता नेटच्या परीक्षेबाबत केंद्र सरकारने सावध पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. तर यूजीसी नेट परीक्षेचं पावित्र्य राखण्यासाठी परीक्षा पुन्हा घेत असल्याच केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

याशिवाय NEET पेपर लीकच्या आरोपांदरम्यान, शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉल आणि NTA ची रचना सुधारण्यावर काम करेल. ही समिती 2 महिन्यांत आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाला सादर करणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT