Bhubaneshwar : ओडिशामध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपने सत्ता काबीज केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिल्याच दिवशी पुरी येथील प्रसिध्द जगन्नाथ मंदिराबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिराचे सर्व चारही दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत.
मोहन चरण माझी यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत त्यांनी जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी उघडण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पहिल्याच दिवशी पूर्ण करण्यात आले आहे.
मंदिरांचे दरवाजे बंद असल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याबाबत माझी यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोरोना काळामध्ये मंदिराचे चार दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना केवळ एकाच दरवाजाचा वापर करता येत होता. पण कोरोनानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने भाविकांचा रोष वाढला होता.
माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या कार्यकाळातील दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय त्यांना चांगलाच भोवला आहे. माझी सरकारने भाविकांच्या भावना ओळखून गुरूवारी सकाळी सर्व दरवाजे उघडले. ते स्वत: यावेळी मंदिरात उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील इतर मंत्री व पुरीचे खासदार संबित पात्राही होते.
यावेळी बोलताना माझी म्हणाले, बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुरूवारी सकाळी 6.30 वाजता मी आणि सर्व आमदार मंगल आरतीसाठी इथे आलो. मंदिर व परिसराच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असल्याचेही माझी यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.