VK Pandian Sarkarnama
देश

VK Pandian : नवीनबाबूंच्या प्रिय ‘व्हीकें’ची हवाई सफर वादात; भाजप सगळंच बाहेर काढणार...

Rajanand More

New Delhi : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत विश्वासू व्ही. के. पांडियान नव्या वादात अडकले आहे. कधीकाळी नवीनबाबूंचे उत्तराधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या व्हीकेंना हवाई सफर महागात पडू शकते. त्यांनी हेलिकॉप्टरमधून केलेला प्रवास त्यासाठी बनविण्यात आलेले हेलिपॅड याची चौकशी करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने बीजेडीचा दणदणीत पराभव केला. पटनायक यांची सत्ता गेली अन् व्हीकेंनीही राजकारणातून संन्यास घेतला. पांडियान हे माजी आयएएस अधिकारी असून ते नवीनबाबूंचे अत्यंत विश्वासू अधिकारी होते. सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते पूर्णवेळ पटनायक यांचे काम पाहायचे. त्यामुळे ओडिशा सरकारमध्ये पटनायक यांच्यानंतर त्यांच्या शब्दाला महत्व आले होते.

सत्तेत असताना पांडियान यांनी पक्षाच्या कामातही सक्रीय सहभाग घेतला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे दौरे व्हायचे. त्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर होत होता. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी राज्यात जवळपास 450 हेलिपॅड तयार करण्यात आल्याचा आरोप ओडिशातील मंत्र्यांनी केला आहे.

ओडिशाचे विधी मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च कुणी केला, याची चौकशी हईल. जिथे-जिथे हेलिकॉप्टर उतरले, तिथे नवीन हेलपॅड बनविण्यात आले. त्यासाठी सरकारी पैसा वापरण्यात आला. पांडियान यांनी 400 ते 450 ठिकाणांचा दौरा केला. याची परवानगी कुणी व कशी दिली, हे स्पष्ट होत नाही. एका विभागाच्या सचिवांकडे हेलिकॉप्टर वापरण्याचा अधिकार नसतो. मग ही मंजूरी कशी मिळाली, असा सवाल हरिचंदन यांनी केला.

चौकशीनंतर योग्य शिक्षा देण्याबाबतही विचार केला जाईल, असा इशाराही मंत्र्यांनी दिला आहे. पांडियान यांनी मागील वर्षी फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत अनेकदा हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. याबाबत आरटीआय कार्यकर्त्यांच्या एका गटाने 24 जुलैला आंदोलन केले होते. पांडिया यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा दुरुपयोग केल्याचा दावा त्यांनी केला होता.

पांडिया यांनी मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये स्वेछानिवृत्ती घेतल्यानंतर नंतर काही दिवसांत बीजेडीमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्षाचा जोरदार प्रचारही केला. दरम्यान, व्हीकेंवरील हे आरोप बीजेडीने फेटाळून लावले आहेत. मात्र, कोणत्याही नेत्यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT