<div class="paragraphs"><p>Air Travel </p></div>

Air Travel

 
देश

धक्कादायक : विमानातून उतरताच तब्बल 125 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुसऱ्या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) हा संसर्ग वाढत असून, देशात तिसरी लाट (Third Wave) आली आहे, असे सरकारने जाहीर केले आहे. आता इटलीतून आलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानातील 125 प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत. अमृतसर विमानतळावर त्यांची चाचणी करण्यात आली होती.

एअर इंडियाच्या विमानाने इटलीहून 179 प्रवासी अमृतसरला आले. अमृतसर विमानतळावर या प्रवाशांची चाचणी करण्यात आली त्यावेळी तब्बल 125 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती विमानतळाचे संचालक व्ही.के.सेठ यांनी दिली. देशातही कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे सुमारे 90 हजार नवीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. रुग्णसंख्येत तब्बल 65 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

भारतात बुधवारी सुमारे 91 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.43 टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदरही वाढला आहे. बुधवारी 24 तासांत 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजाराच्या पुढे गेली आहे. तर बुधवारी सुमारे 19 हजार 200 रुग्ण बरे झाले. सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के एवढे आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargav) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाढत असलेल्या संसर्ग ओमिकॉनमुळे वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सध्या वेगाने वाढ होत आहे. प्रामुख्याने महानगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक आढळून येत आहे. ता. 30 डिसेंबर रोजी पॉझिटिव्हिटी दर 1.1 टक्के एवढा होता. आता हा दर पाच टक्क्यांवर गेला आहे.

देशात 30 डिसेंबरला 13 हजार नवे रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी हा आकडा 58 हजारांवर तर बुधवारी 90 हजारांवर पोहचला. 'महामारी वेगाने पसरत असल्याची ही स्थिती आहे. आर नॉट व्हॅल्यू सध्या 2.69 एवढी आहे. दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते तेव्हा हा दर 1.69 एवढा होता. यावरून सध्याच्या संसर्गाचा वेग लक्षात येतो. आतापर्यंतचा हा सर्वाधिक वेग आहे,' असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT