Karnataka News Sarkarnama
देश

Operation Lotus :'काँग्रेसचे ५० आमदार भाजप हायकमांडच्या संपर्कात'; माजी मंत्र्यांच्या दाव्याने ‘ऑपरेशन लोट्‌स’ची चर्चा

BJP leader's claim : मंत्रिपद न मिळालेले अनेक आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत.

Vijaykumar Dudhale

Karnataka News : कर्नाटकात दुसऱ्या ‘ऑपरेशन लोट्‌स’ची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, अशी चर्चा गेली दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यांसदर्भात तशा हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. खुद्द काँग्रेस नेत्यांकडूनही त्याला दुजोरा मिळत आहे. आता तर खुद्द भाजप नेते, माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी ‘काँग्रेसचे ५० आमदार भाजप हायकमांडच्या संपर्कात आहेत,’ असा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा खळबळ उडाली आहे. (50 Congress MLAs in touch with BJP High Command : Murugesh Nirani)

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा निराणी यांनी करून काँग्रेसचे किमान ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे त्यांनी विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. निराणी यांच्या या दाव्यामुळे भाजपकडून कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक इच्छुक आहेत. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. त्या पक्षात अंतर्गत गटबाजी अगोदरच मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, मंत्रिपद न मिळालेले अनेक आमदार नाराज आहेत. हे नाराज आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील सिद्धरामय्या यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावाही या नेत्याने केला आहे.

सिद्धरामय्या यांचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही. कारण काँग्रेसमध्ये दुफळी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे काँग्रेसचे आमदारच भारतीय जनता पक्षाचे दार ठोठावत आहेत, असेही माजी मंत्री मुरुगेश निराणी यांन स्पष्ट केले. तसेच, त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केले. मी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. जी जबाबदारी पक्ष देईल, ती स्वीकारण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांचा दुजोरा

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा भाजपने कट रचला असून, भाजपची एक टीम आमच्या काही आमदारांना भेटत आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच, काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनीही कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवले जात आहे, असा आरोप केला होता.

सिद्धरामय्या यांच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस पक्षात गोंधळ उडाला आहे. पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार आहे, असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह इतर इच्छुक नेत्यांना धक्का बसला आहे. कारण मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेताना डी. के. आणि सिद्धरामय्या यांना अडीच वर्षांचा कालावधी दिल्याची चर्चा आहे. त्यात सिद्धरामय्या यांनी आपणच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे विधान केल्याने शिवकुमार समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे, साहजिक आहे.

कुमारस्वामी यांचे सरकार ‘ऑपरेशन लोटस’ करून पाडले

दरम्यान, यापूर्वी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडून भाजपने ‘ऑपरेशन लोट्‌स’ यशस्वी करून दाखवले होते. त्यावेळी काँग्रेसचे नाराज आमदार फोडून कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यात आले होते. या वेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे माजी स्वीय सचिव एन. आर. संतोष यांच्या माध्यमातून काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT