Asaduddin Owaisi  Sarkarnama
देश

ओवैसीचे नामोनिशाण मिटेल...आता तो दिवस दूर नाही! मुख्यमंत्र्यांनीच थेट दिली धमकी

वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himata Biswa Sarma) यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ओवैसीचे नामोनिशाण मिटेल, आता तो दिवस दूर नाही, अशा शब्दांत त्यांनी एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना थेट धमकीच दिल्याची चर्चा आहे. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरमा यांनी रविवारी तेलंगणातील वारंगल येथे हे वक्तव्य केलं आहे. तेलंगणातील सरकारवर टीका करतानाच त्यांनी ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, भारताला आता कोणीही रोखू शकत नाही. कलम 370 रद्द करण्यात आलं. राम मंदीराच्या उभारणीचे काम सुरू झाले. त्याचप्रमाणे आता निझामाचे नामोनिशाण मिटेल. ओवैसीचे नामोनिशाण मिटेल. आता तो दिवस दूर नाही. भारतीय आता जागे झाले आहेत, असं सरमा म्हणाले आहेत.

ओवैसी यांच्या पक्षाची तेलंगणात (Telangana) मोठी ताकद आहे. प्रामुख्याने राजधानी हैदराबाद त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच त्यांचा पक्ष आता इतर राज्यांमध्ये हातपाय पसरत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातही ओवैसी यांनी ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जातो. पण सरमा यांनी आता थेट त्यांचे नामोनिशाण मिटेल, अस वक्तव्य केल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सरमा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. सरमा यांनी म्हटले की, मोदींच्या सुरक्षितेतला धोका निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेस कारवाई करण्यास तयार नाही. एकप्रकारे काँग्रेस अशा प्रकारांना मान्यता देण्याची भूमिका घेत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आसाममध्ये आल्यानंतर आम्ही असेच केल्यास? हे स्वीकारार्ह असेल का? ते जर आसाममध्ये आल्यास आम्ही जशास तशी भूमिका घेणार नाही.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून 5 डिसेंबरला विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाला होता. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT