Kerala Politics : केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश ही आपली वैयक्तिक चूक होती, असे त्यांनी राजीनामा देताना म्हटले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या घरवापसीला काँग्रेसमधून टोकाचा विरोध होऊ लागला आहे.
करुणाकरन हे केरळचे चारवेळा मुख्यमंत्री होते. राज्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पद्मजा आणि त्यांचे बंधू के. मुरलीधरन हे दोघेही काँग्रेसमध्येच सक्रीय होते. मात्र, पद्मजा यांनी मार्च २०२४ मध्ये पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुरलीधरन हे सध्या केरळ सरकारमध्ये आरोग्य मंत्री आहेत. पद्मजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. आता पद्मजा पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्यातील नात्याबाबतही तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. मात्र, मुरलीधरन यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पद्मजा यांच्या घरवापसीला काँग्रेसमधून टोकाचा विरोध सुरू झाला आहे.
विरोध होत असल्याचे लक्षात येताच पद्मजा यांनी सोशल मीडियात पोस्ट करत काँग्रेस कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. भाजपमध्ये प्रवेशाच्या निर्णयामुळे माझे वडील आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दु:ख झाले होते. त्यांची मी माफी मागते. भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय मी भावनिक क्षणी घेतला होता. पक्षात कोणत्याही पदाची आकांक्षा नसल्याचे सांगत, पद्मजा यांनी पुन्हा काँग्रेस कार्यकर्ता बनणे ही त्यांची एकमेव इच्छा असल्याचे म्हटले आहे.
पद्मजा यांच्या घरवापसीला काँग्रेसमधील काही गटांकडून, विशेषतः तरुण नेत्यांकडून विरोध होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जिंटो जॉन म्हणाले की, पद्मजा यांनी पक्षात येण्याआधी संघ परिवाराच्या विचारधारेवरील आपल्या भूमिकेबद्दल राजकीय स्पष्टता दाखवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही अटींशिवाय, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून परत यावे. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे विशेष वागणुकीची अपेक्षा त्यांनी करू नये.
केरळ स्टुडंट्स युनियन (केएसयू) चे अध्यक्ष अलोयसियस झेवियर यांनीही पद्मजा यांना कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देण्यास विरोध केला. हजारो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वैचारिक लढाया लढल्या, त्या राजकीय निष्ठा बदललेल्या व्यक्तींसाठी नाही. परत येणाऱ्यांनी बूथ स्तरावर काम केले पाहिजे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना संघटनात्मक पातळीवर संधी मिळायला हवी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.