Jammu and Kashmir News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून राज्य सरकारला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने राज्यातील 87 पैकी 48 पर्यटनस्थळे काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आधीच राज्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. काही पर्यटकांकडून धाडसी वृत्ती दाखवत काश्मीरचे पर्यटन सुरूच ठेवण्यात आले आहे. इतर पर्यटकांनीही यावे, असे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. पण सुरक्षा यंत्रणांनाही वेगळीच चिंता सतावत आहे. पहलगामनंतर यंत्रणांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी कोम्बिग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
काही दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवून देण्यात आली आहेत. त्याचा बदला घेण्यासाठी टीआरटीकडून पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त होत आहे. गुलमर्ग, सोनमर्ग आणि तलाव असलेल्या भागांसह इतर काही संवेदनशील पर्यटनस्थळांवर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथके नियुक्त करण्यात आली आहे. तसेच इतर ठिकाणी सुरक्षाव्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या सुचनेनंतर अब्दुल्ला सरकारने राज्यातील 48 पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. आयएसआयकडून पर्यटकांसह सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी, काश्मिरी पंडित आदींना टार्गेट केले जाऊ शकते, असेही या वृत्तात म्हटले आहे. प्रामुख्याने उत्तर, मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा टार्गेट किलिंगचे प्लॅनिंग केले जात असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या सीमेवरही सैन्याची जुळवाजुळव केली जात असून आक्रमकपणे युध्दाभ्यास सुरू आहे. दर दुसरीकडे विविध माध्यमातून पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. आता पाकिस्तानी विमानांसाठी भारताची हवाई हद्द बंद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरांवर बंदी केली जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.