Kulbhushan Jadhav Sarkarnama
देश

अखेर पाकिस्तान झुकले! कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावाखाली पाकिस्तान सरकार झुकले असून, संसदेने एका विधेयकाला मंजुरी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावाखाली पाकिस्तान (Pakistan) सरकार झुकले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या कारागृहात असलेले भारतीय (India) नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात न्यायालयात (Court) दाद मागता येणार आहे.

पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवशेनात याबाबतच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे जाधव यांना शिक्षेला न्यायालयात आव्हान देता येईल. मागील महिन्यात पाकिस्ताने जाधव यांना वकील देण्यासाठी भारताला दुसरी संधी दिली होती. जाधव यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

पाकिस्तानने दावा केला आहे की, जाधव यांना २०१६ मध्ये बलुचिस्तानमध्ये पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा पाकिस्तानी न्यायालयाने सुनावली आहे. जाधव यांचे इराणच्या विमानतळावरुन पाकिस्तानने अपहरण केले असल्याचा दावा भारताने केला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. जाधव यांना २०१७ मध्ये पाकिस्तान लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरुन दोषी ठरविले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुनरावलोकन करण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी संसदेत काही दिवसांपूर्वी विधेयक सादर केले होते. पाकिस्तानच्या संसदेत हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले होते. आता जाधव यांना शिक्षेला आव्हान देण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

जाधव यांच्या शिक्षेचा पाकिस्तानने आढावा घेऊन पुनर्विचार करायला हवा. तसेच, यापुढे कोणताही उशीर न करता भारतीय वकिलाची नियुक्ती केली जावी, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये दिलेल्या निर्णयात म्हटले होते. या प्रकरणात भारतीय वकिलाची नेमणूक करण्याची मागणी भारताकडूनही वारंवार करण्यात आली होती. परंतु, ही मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT