मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) आता चांगलेच अडचणीत आले आहेत. न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तीन जणांना फरारी गुन्हेगार घोषित (Proclaimed Absconding Offender) केले आहे. त्यांच्याकडे आता हजर होण्यास 30 दिवसांचा कालावधी असून, त्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरवात करतील.
खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्यासह विनयसिंह आणि रियाज भाटी यांना आज न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना दणका दिला आहे.
आता मुंबई पोलीस परमबीरसिंह यांच्या निवासस्थानावर ते फरार गुन्हेगार असल्याची नोटीस लावू शकतात. त्यांना हजर होण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी असेल. ते 30 दिवसांत हजर न झाल्यास त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मुंबई पोलीस सुरवात करतील. यात परमबीरसिंह यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जाऊ शकतात.
मुंबईतील एस्पेलेनेड न्यायालयाने खंडणी प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासह तिघांविरोधात मागील आठवड्यात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. परमबीरसिंह यांच्यासोबतच विनयसिंह आणि रियाज भाटी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. परमबीरसिंह हे सापडत नसून गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे. गुन्हे शाखेकडून परमबीरसिंह यांच्या विरोधात दाखल प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच प्रकरणात छोटा शकीलचा हस्तक रियाज भाटी हासुद्धा आरोपी आहे . सध्या तो फरार आहे.
परमबीरससिंह यांच्या विरोधात एकूण तीन अटक वॉरंट बजावण्यात आली आहेत. परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये परमबीरसिंग अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीसही यापूर्वी काढण्यात आली होती. ते परदेशात पळून गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अखेर मुंबई पोलिसांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
मुंबईच्या आयुक्तपदावरून गृहरक्षक दलामध्ये उचलबांगडी केल्यानंतर परमबीरसिंह यांनी 20 मार्चला लेटर बॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारला अडचणीत आणले होते. परमबीरसिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. मात्र, अनेक महिने ते गैरहजर राहिल्याने कोषागार कार्यालयाने विचारणा केली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परमबीरसिंह 8 दिवसांची रजा घेऊन चंडीगडला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर तिथूनच ते आजारपणाची रजा दर 15 दिवसांनी वाढवत होते. नंतर ते फरार झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.