Parliament Attack 2001 Raosaheb Danve Sarkarnama
देश

Raosaheb Danve: गोळीबार सुरू होता, आम्ही सर्व खासदार सभागृहात होतो, अतिरेकी शिरले...!

Parliament Attack 2001 : संसद भवनाच्या मुख्य दरवाजातून एक गोळी रूम क्रमांक आठच्या दरवाज्याला लागली.

Tushar Patil

तुषार पाटील

Bhokardan News: संसद भवनावरील हल्ल्याला आज (बुधवार) 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठ स्नान घालण्यात आले होते. या हल्ल्यातून सर्व लोकप्रतिनिधी सुखरूप बचावले. या हल्ल्याच्या वेळी तत्कालीन खासदार व आत्ताचे विद्यमान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे संसद भवनात उपस्थित होते "सरकारनामा" कडे त्यांनी हल्ल्यातील काही गोष्टींना उजाळा दिला.

त्यांच्या गाडीला लाल दिवा होता...

13 डिसेंबर 2001 त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी संसद भवनात गेलो होतो, पोटा कायद्यावरून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या खासदारांना उपस्थित राहण्याचे व्हीप बजावले होते. त्यामुळे संसद भवन खचाखच भरलेले होते. सध्या संसद भवनाला जेवढी सुरक्षा आहे. तेवढी कडक सुरक्षा व्यवस्था त्यावेळेस नव्हती. सामान्य माणूस सुद्धा सहज ये-जा करू शकत होता. याआधी अशा प्रकारचा कुठलाही हल्ला झालेला नव्हता. जे अतिरेकी संसद भवन परिसरात आले त्यांच्या गाडीला लाल दिवा होता. त्यामुळे ते साहजिकच आत शिरले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

प्रमोद महाजन यांना ही घटना लक्षात आली..

संसद भवनाच्या सभागृहात शिरण्याचा त्यांचा डाव होता. संसद भवनाच्या मुख्य दरवाजातून एक गोळी रूम क्रमांक आठच्या दरवाज्याला लागली, जर मुख्य दरवाज्यातील सुरक्षा रक्षक बेसावध असते तर कदाचित अतिरेकी सभागृहात शिरले असते. आम्ही सर्व खासदार सभागृहात होतो. आम्हाला बाहेरचा आवाज ऐकू आला काय झालं हे बघण्यासाठी बाहेर पडलो त्यावेळेसचे संसदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन यांना ही घटना लगेचच लक्षात आली.

प्रमोद महाजन यांचा कक्ष सभागृहाला लागूनच होता. प्रमोदजी आतमध्ये बसले होते, त्यांनी आम्हां खासदारांना सांगितले गृहमंत्री लालकृष्ण अडवानींना आपल्याला सुखरूप या कक्षात आणायचा आहे. मी व भाजपचे अन्य काही खासदार आम्ही प्रमोदजींच्या सांगण्याप्रमाणे हाताचे सुरक्षेचे कडे बनवले व अडवानींना सुखरूप कक्षात आणले. गृहमंत्री लालकृष्ण अडवानी आम्हाला धीर देत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरक्षा रक्षकांमुळे फार मोठा अनर्थ टळला...

आम्ही मुख्य दरवाज्यात आलो तर काही सुरक्षा रक्षकांना गोळ्या लागलेल्या होत्या. काही वेळात हे सर्व शांत झाले व सर्व अतिरेक्यांना ठार केल्यानंतर संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी बाहेर येऊन संसद भवन परिसराची पाहणी केली. नंतर सर्व लोकप्रतिनिधींना गाडीत बसवून निवासस्थानी पाठवण्यात आले. सुरक्षा रक्षकांमुळे फार मोठा अनर्थ टळला.

माझे स्वीय सहाय्यक सोपान सपकाळ हे...

संसद भवन हल्ल्यात शहीद झालेले सुरक्षा कर्मचारी जगदीश यादव व अन्य दोघांशी माझे स्नेहाचे संबंध होते. अगदी हल्ल्याच्या दिवशी सकाळीच जगदीश यादव यांना मी दिवाळी भेट देखील दिली होती. मात्र हल्ल्यात ते शहीद झाल्याचे समजल्याने अत्यंत दुःख झाले.जगदीश यादव यांच्याशी संसदेत ये-जा करतांना आमचे नेहमी बोलणे होत असे. माझे संसदीय स्वीय सहाय्यक सोपान सपकाळ हे हल्ल्याच्या वेळी मुख्य गेटवर असल्याची मला कल्पना होती. त्याच्या जीवाच्या काळजीने तपासासाठी मी राममनोहर लोहिया हॉस्पिटल व इतर ठिकाणी चौकशी देखील केली. सुदैवाने ते देखील या हल्ल्यातून सुखरूप बचावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT