New Delhi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. एनडीए सरकारमध्ये किंगमेकर असलेल्या नितीश कुमार यांची सर्वात मोठी मागणी बासनात गुंडाळण्यात आली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असे सरकारने सोमवारी लोकसभेत स्पष्ट केले.
जेडीयूच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यावर सरकारने थेट नकार दिला आहे. अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वीही जेडीयूने हा मुद्दा उचलून धरला होता. पण सरकारकडून नकारघंटा मिळाल्याने राजकारण सुरू झाले आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, राष्ट्रीय विकास परिषदेने यापूर्वी काही राज्यांना विशेष दर्जा दिला होता. या राज्यांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता होती. राज्यांच्या विशिष्ट स्थितीच्या आधारावर केंद्राने वेळोवेळी निर्णय घेतला आहे. बिहारला विशेष दर्जा देण्यासाठी आंतर मंत्रालयीन गटाने विचार केला होता. या गटाने 30 मार्च 2012 मध्ये अहवाल दिला होता. त्यानुसार बिहारला विशेष दर्जा देता येणार नाही.
सरकारच्या या उत्तरावरून जेडीयूनेही नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील सुत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली. काही तांत्रिक मुद्दे असतील तर सरकारने बिहारच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्यावे. बिहारला विशेष दर्जा देण्याच्या आश्वासनामुळे आम्ही एनडीएमध्ये आहोत, हे स्पष्ट करतो, असेही या सुत्रांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे एनडीएतील दुसरा पक्ष असलेल्या लोक जनशक्ती दलाने हीच मागणी 21 जुलैच्या सर्वपक्षीय बैठकीत केली होती. दरम्यान, यावरून राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही. नितीश कुमार आणि जेडीयूवाल्यांनी आता आरामात केंद्रातील सत्ता उपभोगत विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीचे ढोंग आणि राजकारण करावे, असा निशाणा आरजेडीने साधला आहे.
आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून बिहारसाठी ही मागणी होत आहे. त्यामुळे एनडीएमध्ये असलेल्या जेडीयूकडून संसदेत आणि संसदेबाहेर याबाबत काय भूमिका घेतली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.