New Delhi : देशात नीट पेपरफुटीचा मुद्दा गाजत असून त्याचे पडसाद सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. पहिल्याच दिवशी काँग्रेस सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. यादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
काँग्रेस सदस्यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनीही त्याबाबत शिक्षण मंत्र्यांना टार्गेट केले. ते मंत्रिपदावर असेपर्यंत यातून मार्ग निघणार नाही, असे सूचक विधान केले. त्यानंतर राहुल गांधी यांनीही प्रधान यांच्यावर टीका केली.
नीट पेपरफुटीच्या मुद्यावर बोलताना राहुल यांनी प्रधान यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, देशातील परीक्षा यंत्रणेबाबत देशात चिंतेचे वातावरण आहे. केवळ नीट नव्हे तर सर्वच प्रमुख परीक्षांबाबत ही स्थिती आहे. मंत्री स्वत:ला वगळता सर्वांना दोष देत आहेत. इथे काय सुरू आहे, याचे गांभीर्यही त्यांना आहे की नाही, माहिती नाही.
तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही भारतीय परीक्षा यंत्रणा विकत घेऊन शकता, असे देशातील कोट्यवधी लोकांना वाटते. विरोधकांनाही असेच वाटते, असे म्हणत राहुल यांनी नीटवर चर्चेसाठी एक दिवस राखीव ठेवण्याची मागणी केली.
राहुल यांच्या टीकेनंतर प्रधान यांनीही त्यांना चांगलेच सुनावले आहे. मला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. पंतप्रधानांनी मला ही जबाबदारी दिली आहे. काँग्रेसच्या काळात 2010 मध्ये पेपरफुटीबाबत विधेयक मांडण्यात आले होते. पण ते मंजूर करण्यात आले नाही. त्यावेळी काँग्रेसवर कुणाचा दबाव होता, असे म्हणत त्यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला.
मागील सात वर्षात पेपरफुटीचा एकही पुरावा सापडलेला नाही. सध्या हा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडून 240 परीक्षा यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच परीक्षांवर आक्षेप घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही प्रधान म्हणाले.
राहुल यांच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही नाराजी व्यक्त केली. सर्वच परीक्षांवर आक्षेप घेणे चुकीचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आहेत. तिथेही यशस्वीपणे परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामुळे अशी विधाने करू नयेत, अशी सूचना बिर्ला यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.