Lok Sabha Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांत विरोधी पक्षातील खासदारांचे ऐतिहासिक निलंबन करण्यात आले. आतापर्यंत या अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेतील एकूण 141 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने भाजपाला आव्हान देणाऱ्या विरोधकांचा आवाज कमकुवत झाला आहे. 'इंडिया' आघाडातील बहुतेक सर्व आक्रमक खासदारांसह इतर ज्येष्ठ खासदारांचाही निलंबित सदस्यांमध्ये समावेश आहे. लोकसभेत विरोधी बाकांवर केवळ 47 खासदार उऱले आहेत.
लोकसभेतील (Lok Sabha) घुसखोरीच्या मुद्यावर विरोधकांकडून दोन्ही सभागृहात आवाज उठवला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या मुद्यावर दोन्ही सभागृहात निवेदन देण्याची विरोधकांची मागणी आहे. त्यावरून झालेल्या गोंधळामुळे आतापर्यंत 141 सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक 95 खासदार लोकसभेतील आहेत.
लोकसभेच्या एकूण जागा 543 आहेत. त्यापैकी 21 जागा रिक्त असून सध्या 522 खासदार आहेत. भाजप व मित्रपक्षांचे 323 तर 142 खासदार विरोधी बाकांवरील आहेत. त्यापैकी 67 टक्के खासदारांचे निलंबन झाले आहे. त्यामुळे लोकसभेत आता केवळ 47 खासदार उरले आहेत. तुलनेने राज्यसभेत विरोधी पक्षांचे जवळपास शंभर सदस्य आहेत.
लोकसभेत उरलेल्या विरोधी खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार हे वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीचे आहेत. मात्र या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्यांवर भाजपचे समर्थन केले जाते. सध्याच्या 'इंडिया' आघाडीच्या मागणीतही हे खासदार सक्रीय नाहीत. लोकसभेत वायएसआरचे २१ आणि बीजेडीचे 12 म्हणजे उऱलेल्या 47 खासदारांपैकी 33 खासदार या दोन पक्षांचे आहेत.
अधिवेशनाचे आता केवळ तीन दिवस उरले आहेत. निलंबित खासदार अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले असले तरी हे या सरकारचे अखेरचे अधिवेशन आहे. त्यातच प्रामुख्याने लोकसभेत विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यामुळे सरकारला पुढील अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडून महत्त्वाची विधेयके संमत करणे शक्य होणार आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.