Patna opposition meeting  Sarkarnama
देश

Patna opposition meeting : …तर मोदींना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल ; विरोधी पक्षाच्या बैठकीवरून ठाकरे गटाचं टीकास्त्र

सरकारनामा ब्युरो

Patna News : आगामी लोकसभेसाठी रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची आज (शुक्रवारी) पाटणा येथे बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुक अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन पाटणा येथे पोहोचले आहेत. (Patna opposition meeting LIVE UPDATES)

आजच्या बैठकीवर 'सामना'मधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. "पाटण्याच्या बैठकीत थोडे चिंतन-मंथन झाले आणि वज्रमूठ उगारली तर 2024ला मोदी यांना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल. पाटण्यात त्यासाठीच एकीचा नारा द्यायचा आहे," अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपावर टीका केली आहे. देशभक्त पक्षांच्या आजच्या पहिल्याच बैठकीसाठी पाटण्याची भूमी निवडली हे योग्यच झाले, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

"पाटण्यातील हा ‘मेळा’ म्हणजे ‘देश बचावो’ आंदोलन आहे. देशातील जनतेची मने पुरती मेलेली नाहीत, हे कर्नाटक विधानसभेच्या निकालांनी स्पष्ट केले. लोकांनी कर्नाटकात जो सुज्ञपणा दाखवला तो संपूर्ण देशात दाखवला पाहिजे व त्यासाठी आधी अठरापगड पक्षांनी ऐक्याची मोट बांधली पाहिजे. पाटण्याच्या पहिल्याच बैठकीत फार मोठ्या चमत्काराची आशा धरता येणार नाही, पण सुरुवात होत आहे व अनेक तोंडे एकत्र बसून विचार करतील, हे महत्त्वाचे असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.

आधी एकत्र या व मग पुढचे बोलू. आप, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीसारख्या पक्षांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे मोदी व त्यांच्या हुकूमशाहीलाच पाठबळ मिळणार आहे. 2024नंतर देशात लोकशाही संपवायची नसेल तर आज पाटण्यात जमणाऱ्या सर्व नेत्यांनी राष्ट्रहितासाठी विशाल मनाचे राजकारण करणे गरजेचे आहे. सगळे एकत्र येतील तेव्हाच मतदारांत आत्मविश्वासाची वावटळ उठेल. मोदींचा प्रयत्न या ना त्या मार्गाने भाजप विरोधकांची एकजूट तोडण्याचा आहे. किमान 450 जागांवर एकास एक लढत होऊ शकेल व याच लढतीत भाजपचा पराभव होईल, अशी शक्यता अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • भाजपविरोधक पाटण्यात एकवटणार असे बोलणे चुकीचे आहे. लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी देशभक्त पक्ष एकत्र येत आहेत, असेच बोलणे सयुक्तिक ठरेल.

  • 1975 साली याच पाटण्याच्या भूमीवरून जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्याचा व क्रांतीचा नारा दिला होता व देशात क्रांतीचा वणवा पेटला होता.

  • काँग्रेसच्या विरोधात त्यावेळी सर्वच राजकीय पक्ष एकवटले आणि एकमेकांत विलीन झाले होते. त्या एकीच्या वज्रमुठीने इंदिरा गांधींचाही पराभव झाला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही नाट्यप्रयोग केले तरी त्यांचा दारुण पराभव होऊ शकतो, हे देशातील अनेक राज्यांनी दाखवून दिले.

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT