pawan pandey
pawan pandey Shivsena
देश

कलाबेन यांच्या आधी पवन पांडेंनी सेनेचा भगवा महाराष्ट्राबाहेर फडकवला होता

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : देशभरातील पोटनिवडणूकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात एक निकाल अत्यंत लक्षणीय ठरला आहे. कारण दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील (Dadra Nagar Haveli Union Territory) पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) या जवळपास ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या रुपाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदार मिळाला आहे. मात्र शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर मिळालेले हे पहिलेच यश नाही. शिवसेनेचा भगवा देशपातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान जातो तो पवनकुमार पांडे (Pawan Pandey) यांना. १९९१ सालच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते.

उत्तरप्रदेशमधल्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील कोतवा मोहमदपुर गावचे रहिवासी असलेले पांडे हे ८०-९० च्या दशकात हिंदूत्ववादी विचारांनी भारावले होते. अयोध्येत राम मंदिर व्हायलाच हवे, हे ते पक्के ठरवून होते. १९८६ साली खुद्द बाळासाहेबांच्या उपस्थितीत पवनकुमार पांडेंचा शिवसेना प्रवेश पार पडला होता. तिथून त्यांची धडाकेबाज राजकीय कारकिर्द सुरु झाली होती. असे म्हंटले जायचे की, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर पवनकुमारांना बाळासाहेब आपला मानसपुत्र मानायचे. पुढे त्यांना उत्तरप्रदेश शिवसेनेचे अध्यक्षही करण्यात आले होते. याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला होता. साधारण १९८९-९० च्या दरम्यान पांडे श्रीराम जन्मभूमि न्यासचे अध्यक्ष रामचंद्र परमहंस यांच्या संपर्कात आले. राम जन्मभुमी आंदोलनाच्या दरम्यान पवन पांडे यांना तब्बल १७ वेळा जेल झाली होती.

उत्तरप्रदेशच्या पुर्वांचल भागात पांडेंची आधीच बाहुबली नेता अशी ओळख होती. त्यात राम मंदिर आंदोलनाने त्यांना कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी अयोध्येत कारसेवकांवर केलेल्या गोळीबारात ते अगदी थोडक्यात वाचले होते. त्यांची बाहुबली ओळख आणि राम मंदिर आंदोनलामुळे मिळालेली ओळख यामुळे १९९१ सालच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कंबरपूर मतदारसंघातून त्यांनी सहज विजय मिळवला. त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आलेल्या बाबरी मशीदीमध्येही आपला सहभाग असल्याच ते स्वतः सांगतात.

पुढे मात्र काळाच्या ओघात पवन पांडे मायावतींच्या साथीने गेले. २०१४ साली त्यांनी वरून गांधींच्या विरोधात सुलतानपूरमधूनही निवडणूक लढवली होती. मात्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. काही काळानंतर ते पुन्हा शिवसेनेत पुन्हा परतले. आजही पूर्वांचल भागातील राजकारणात पांडेंचे मोठे वजन आहे. त्यांचा भाऊ व पुतणे हे देखील राजकारणात सक्रिय असून त्यांनी देखील निवडणुका जिंकलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT