PM Kisan Samman Yojana 
देश

PM Kisan Yojana: आता 'पीएम किसान योजना' अडचणीत? 'या' खात्यांवर सरकारला संशय; होणार फेरतपासणी

PM Kisan Yojana 2025: केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहून १५ ऑक्टोबरपर्यंत व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितल आहे.

Amit Ujagare

PM Kisan Yojana 2025: केंद्र सरकारनं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील ३१.०१ लाख लाभार्थ्यांवर संशय व्यक्त केला आहे. या खात्यांची पुनर्पडताळणी करण्याचा निर्णय केंद्रीय कृषीमंत्रालयानं घेतला आहे. त्यानुसार, मंत्रालयानं राज्यांना पत्र पाठवलं असून या खात्यांचं व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी येत्या दिवसांपर्यंत म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळं जर या खात्यांमध्ये काही गडबड घोटाळा आढळून आला तर या लाभार्थ्यांवर अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते.

खाती नेमकी कुठली?

केंद्रीय कृषी खात्यानं चिन्हांकित केलेल्या या खात्यांमध्ये पती आणि पत्नी हे दोघेही एकाच वेळी रोख रक्कमेचा लाभ घेत होते. किसान कल्याण मंत्रालयाकडून राबवण्यात येत असलेल्या व्यापक चौकशी अभियानातून हा खुलासा झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ३१.०१ लाख खात्यांपैकी १९.०२ लाख लाभार्थ्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालं असून यांपैकी १७.८७ लाख म्हणजेच ९३.९८ टक्के लाभार्थी एकमेकांचे पती-पत्नी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ

देशातील सर्व शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या पीएम-किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार डीबीटी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात वार्षिक ६००० रुपये जमा करते. एका शेतकरी कुटुंबात केवळ एक सदस्य (पती किंवा पत्नी किंवा अल्पवयीन मुलं) या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कृषी मंत्रालयानं १.७६ लाख अशी प्रकरणं शोधून काढली आहेत ज्यामध्ये अल्पवयीन आणि एकाच कुटुंबातील अन्य सदस्य पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ३३.३४ लाख संशयीत प्रकरणंही शोधून काढली आहेत. ज्या ठिकाणी मागच्या जागा मालकाचे व्यवहार रिजेक्ट झालेत किंवा रिक्त आढळले आहेत.

आधीचा आणि आत्ताचा मालक घेताहेत लाभ

१ फेब्रुवारी २०१९ नंतर भूमी हस्तांतरीत करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान योजनेच्या निकषांनुसार नोंदणी दरम्यान आधीच्या जमीन मालकांचा तपशील सादर करणं अनिवार्य आहे. या योजनेनुसार, पूर्वीच्या जमीन मालकाला या योजनेचा लाभ मिळता कामा नये. पण जमीनीच्या विक्रीपूर्वीचा मालक आणि विक्रीनंतरचा दुसरा मालक अशा दोघांनीही या योजनेचा लाभ घेतल्याची ८.११ लाख प्रकरणं समोर आली आहेत. काही वर्षांपासून सरकारनं योग्य आणि पात्र व्यक्तीलाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्यानुसार, १ जानेवारी २०२५ रोजी पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणीसाठी शेतकरी आयकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.

९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना निधी वाटप

पंतप्रधान शेतकरी योजना लोकसभा निवडणुकीच्या आधी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु करण्यात आली होती. ही केंद्रीय योजना असून ज्याचा १०० टक्के निधी हा केंद्र सरकारकडून दिला जातो. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगसट २०२५ रोजी वाराणसीत या योजनेचा २० वा हप्ता ट्रान्सफर केला होता. याचा देशभरातील ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा निधी ट्रान्सफर करण्यात आला होता.

निधी दुप्पट करण्यासाठी शिफारस

केंद्र सरकारनं केंद्रीय बजेट २०२५-२६ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नुकत्याच एका संसदीय समितीनं या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वार्षिक ६,००० रुपयांवरुन दुप्पट म्हणजे १२,००० रुपये करण्याची शिफारस केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT