PM Narendra Modi Sarkarnama
देश

MLC Election Results : PM मोदींच्या वाराणसी मतदारसंघातच भाजपला दोन जबर धक्के! विधानपरिषदेची शिक्षक अन् पदवीधरची जागा समाजवादी पक्षाच्या खिशात

BJP Faces Twin Setback in PM Modi's Varanasi : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

Uttar Pradesh Legislative Council Election Results News : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव यांनी भाजपचे प्रमोद मिश्रा यांचा पराभव केला आहे. दुसरीकडे, वाराणसी पदवीधर मतदारसंघातही समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी भाजपचे केदारनाथ सिंह यांच्याविरोधात 9 हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असल्याने येथील निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षक मतदारसंघातील पराभव आणि पदवीधर मतदारसंघातील पिछाडी यामुळे भाजपवर या निवडणुकीत नामुष्की ओढवली आहे.

शिक्षक मतदारसंघात लाल बिहारी यादव यांची बाजी

वाराणसी शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार लाल बिहारी यादव यांनी आपली जागा राखली. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांचा सुमारे पाच हजार मतांनी पराभव केला.

लाल बिहारी यादव यांना एकूण 11 हजार 612 मते मिळाली, तर भाजपचे प्रमोद मिश्रा यांना 6 हजार 597 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे यादव यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला.

पदवीधर मतदारसंघातही सपाची आघाडी

शिक्षक मतदारसंघातील विजयानंतर समाजवादी पक्षाचा उत्साह वाढला असतानाच, वाराणसी पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीतही सपा उमेदवार आशुतोष सिन्हा यांनी भाजपचे उमेदवार केदारनाथ सिंह यांच्याविरोधात आघाडी घेतली.

मतमोजणीच्या उपलब्ध माहितीनुसार, सिन्हा यांनी सुमारे नऊ हजार मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातही भाजपसमोर पराभवाचे संकट उभे राहिले आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघाचा अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला नव्हता.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय संदेश?

उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीतील निकालांना राजकीय महत्त्व आहे. वाराणसीसारख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने शिक्षक मतदारसंघाची जागा राखणे आणि पदवीधर मतदारसंघात आघाडी घेणे, ही अखिलेश यादव यांच्या पक्षासाठी उत्साहवर्धक बाब ठरू शकते.

या निकालांच्या माध्यमातून समाजवादी पक्षाला भाजपविरोधात राजकीय वातावरण निर्माण करण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, भाजपला शिक्षक आणि पदवीधर मतदारांमधील आपल्या संघटनात्मक ताकदीचा आढावा घ्यावा लागू शकतो.

मात्र, विधान परिषद निवडणुकीतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचा निकाल हा मर्यादित मतदारवर्गाचा कौल असतो. त्यामुळे त्यावरून संपूर्ण उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. तरीही, पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात समाजवादी पक्षाने मिळवलेले यश भाजपसाठी राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT