PM Modi security update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या मार्गावर रविवारी जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हा कांड्या आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. विशेष म्हणजे सकाळी एका व्यक्तीने स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा फोन पोलिसांना केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेंगलुरू दौऱ्यावर होते. कग्गलीपुरा परिसरातील आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या मार्गावरील फुटपाथवरच जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. पंतप्रधान कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होण्याआधीच सुरक्षा यंत्रणांनी जिलेटीनच्या कांड्या शोधून काढल्या. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांना सकाळी एका व्यक्तीने फोन करून एचएएल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरच्या जवळ स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती धमकी देणारीच असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली होती. पण एचएएल याठिकाणी काहीच संशयास्पद आढळून आले नाही.
आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरपासून काही मीटर अंतरावरील फुटपाथवर जिलेटीन कांड्या आढळून आल्या. याच मार्गावर पंतप्रधान मोदींचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार होता. पोलिसांकडून आता संबंधित व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. जिलेटीनच्या कांड्या त्याच्याकडे कुठून आल्या, त्या पंतप्रधान मोदींच्या मार्गावर का ठेवल्या, त्या असे करण्यासाठी कुणी सांगितले आदी बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
संबंधित संशयित व्यक्तीने यापूर्वी बेंगलुरूमध्ये अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी असे धमकीचे फोन केले होते. मात्र, त्यावेळी संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. यावेळी मात्र त्याच्या धमकीनंतर पंतप्रधानांच्या मार्गावरच स्फोटके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. पंतप्रधानांच्या ताफा संबंधित मार्गावरून जाण्याआधीच पोलिसांना स्फोटके सापडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.