PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi Government : मोदींचं मंत्रिमंडळ होणार जम्बो? आणखी 9 खासदार बनू शकतात मंत्री

Rajanand More

New Delhi : राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 71 जणांचाही मंत्रिपदाची शपथविधी झाला. यावेळचे मोदींचे मंत्रिमंडळ मागील दोन टर्ममधील मंत्रिमंडळापेक्षा मोठे आहे. 2014 मध्ये मंत्रिमंडलात केवळ 46 मंत्री होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यात 13 मंत्र्यांची भर पडून ते 59 पर्यंत वाढले होते.

तिसऱ्या टर्ममध्येही मंत्रिमंडळात 13 मंत्री वाढले आहेत. हा योगायोगचं म्हणावा लागेल. यावेळी मोदींना घटकपक्षांवर अधिक अवलंबून राहावे लागणार असल्याने त्यांच्या खासदारांची मंत्रिमंडळातील संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही मंत्रिपदावरून नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) पदावर पाणी सोडले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जम्बो मंत्रिमंडळ होऊ शकते. विस्तारामध्ये मंत्रिमंडळात आणखी नऊ मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो.

घटनेत काय तरतुद?

राज्यघटनेने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या निश्चित केली आहे. राज्यघटनेतील 91 व्या दुरुस्तीनुसार लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्के खासदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाऊ शकते. सध्या लोकसभेत 543 सदस्य असून त्याच्या 15 टक्के म्हणजे 81 मंत्री होऊ शकतात.

मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये 30 कॅबिनेट, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री आहेत. हा आकडा वाढून 81 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे घटकपक्षांतील नाराजीनाट्य वाढू लागल्यास किंवा मंत्रिपदांची आणखी मागणी झाल्यास मोदींकडून मंत्रिमंडळाचा विस्तार करून नऊ खासदारांना संधी दिली जाऊ शकते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT