PM Narendra Modi : 79 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. त्यांच्या दीड तासाच्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर भर दिला. त्यातील महत्वाच्या दहा मुद्दे पाहुया.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाकडून अणुबाॅम्बच्या वापराची धमकी देण्यात आली होती. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिले. अणुबाॅम्बच्या ब्लॅकमेलिंगला घाबरत नाही. आमचे सैन्य त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून दहशतवादी मुख्यालय नष्ट केले. आता त्यांच्याकडून रोज नवनवे खुलासे समोर येत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे. या अंतर्गत २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना या राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणले जाईल. या सुरक्षा कवचाचा विस्तार सातत्याने होत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित वाटावे, यासाठी मी २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला आहे, असे मोदी म्हणाले.
विकसित भारत योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरुणाला पहिली खासगी नोकरी लागल्यानंतर त्याला 15 हजार रुपये देण्यात येतील, असा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केला. तसेच नोकऱ्यांच्य निर्मितीसाठी खासगी कंपन्याला देखील प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा करत म्हटले की, वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू. चार पाच दशकांपूर्वी सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होती पण कोणी लक्ष दिले नाही. पण आम्ही हा अपराध दूर करू, असे देखील त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी स्वदेशी मालाच्या वापरावर भर दिला. दुकानदारांनी पाटी लावायला हवी की येथे स्वदेशी माल मिळतो. स्वदेशीचा वापर ही बळजबरी नको तर जबाबदारी हवी. स्वदेशीच्या वापरामुळे पाकिस्तान विरोधातील युद्धात आपण आपली ताकद दाखवू शकलो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहे याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी म्हणाले, 100 वर्षांपूर्वी आरएसएसचा जन्म झाला. हा राष्ट्रसेवेची 100 वर्षे हा एक गौरवशाली आणि सुवर्ण अध्याय आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि शिस्त ही आरएसएसची ओळख आहे.
जीएसटीबाबतही पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की दिवाळीपासून आमचे सरकार नवे जीएसटी सुधारणा घेऊन येत आहे, ज्याअंतर्गत विद्यमान जीएसटी दरांचे पुनरावलोकन केले जाईल. तसेच कर संरचना (टॅक्स स्लॅब) अधिक तर्कसंगत केली जाईल.
जीएसटी अंतर्गत सध्या विविध प्रकारचे कर स्लॅब आहेत, जे वस्तूंवर वेगवेगळे लागू होतात. नव्या जीएसटी सुधारणा अंतर्गत या सर्व वस्तूंवर लागू असलेल्या जीएसटीचे पुनरावलोकन केले जाईल, त्यानंतर कोणत्या वस्तूवर किती जीएसटी दर लागू करायचा हे ठरवले जाईल.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्वदेशाचा पुरस्कार करत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. ते म्हणाले, जर तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्यीची सवय झाली तर तुम्ही कधी गुलाम किंवा इतरांवर अवलंबून राहता हे तुम्हाला कळतही नाही. स्वतःच्या ताकदीचे रक्षण आणि देखभाल करण्यासाठी स्वावलंबन खूप महत्वाचे आहे, असे सांगत मोदींनी आत्मनरि्भर भारताचे महत्व सांगितले.
भारतातून राहणाऱ्या पाण्यावर फक्त भारतातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे. सिंधू जलवाटप अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शेतकरी आणि मच्छिमाऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, असे म्हणत वोकल फॉर लोकल चा नवा नारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.