Narendra Modi Italy Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे 2026 दरम्यान संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांचा झंझावाती दौरा केला. मात्र या संपूर्ण दौऱ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती इटली भेटीची!
इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलोनी यांना मोदी यांनी दिलेल्या ‘मेलोडी’ चॉकलेट गिफ्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. ‘मेलोडी’ हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला, तर विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या दौऱ्यावर टीका करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्यामागे वेगळंच कारण असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला की, भारतातून इस्रायलला पाठवण्यात येणाऱ्या मिलिटरी-ग्रेड स्टीलसह चार जहाजांना इटलीने रोखून धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या जहाजांमध्ये सुमारे 800 टन मिलिटरी स्टील असून त्यापासून सुमारे 17 हजार गोळे तयार होऊ शकतात. हे शस्त्रसाहित्य गाझा पट्टीमध्ये वापरले जाण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंबेडकर यांनी पुढे दावा केला की, इटलीतील बंदरांवरील कामगार संघटनांच्या दबावामुळे ही जहाजे थांबवण्यात आली. तसेच, इराणला या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर भारताला होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “जगभरात ही माहिती जाऊ नये म्हणूनच पंतप्रधान मोदी इटलीला गेले,” असा गंभीर आरोपही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
याच पोस्टमध्ये आंबेडकर यांनी पुन्हा एकदा तथाकथित ‘एपस्टीन फाइल्स’चा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव असल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या या विधानांमुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारकडून मात्र मोदींच्या इटली दौऱ्याला धोरणात्मक आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. भारत-इटली संबंध अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मोदी इटलीत पोहोचताच पंतप्रधान जाॅर्जिया मेलोनी यांनी “Welcome to Rome, my friend” असे म्हणत मोदींसोबतचा खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. या दोन्ही नेत्यांमधील ‘केमिस्ट्री’ची जागतिक पातळीवर चर्चा झाली. त्यानंतर रोममधील ऐतिहासिक Colosseum येथे रात्रीच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.