

Ramdas Athawale Shirdi visit : परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचं आवाहन केलं. राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मंत्री, आमदार-खासदारांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील इंधन बचतीसाठी सायकल प्रयोग सुरू केले आहेत.
पंतप्रधानांचे आवाहन हे वर्षभरासाठी आहे. हे सर्व प्रयोग कितपत टिकतात याकडे लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुंबईत विधानभवन मेट्रो स्टेशन ते धारावी, असा मेट्रो प्रवास केला. पण आता अहिल्यानगर शिर्डी दौऱ्यात त्यांच्या ताफ्यात कार्यकर्ते 20 ते 25 वाहन घेऊन सहभागी झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना, मंत्री आठवले यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर कविता करत, विरोधकांना डिवचलं आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले काल अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते. मंत्री आठवले यांच्या उपस्थितीत शिर्डी (Shirdi) इथल्या सरकारी विश्रामगृह इथं समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी मंत्री आठवले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या 20 ते 25 गाड्यांचा ताफा बघायला मिळाला.
प्रधानमंत्री मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनाची आठवण पत्रकारांनी करून दिली असता, मंत्री आठवले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, "माझ्या ताफ्यात एकच गाडी आहे. मात्र कार्यकर्ते माझ्याकडे काम घेऊन येताना चालत येणार नाहीत. ट्रॅक्टरमधून यायचं म्हटलं तरी डिझेल लागणार आहे. गाड्यांचा मोठा ताफा होणार नाही, याचे प्रयत्न पुढील काळात करू."
पेट्रोल-डिझेल बचतीसाठी मेळावे कमी केले पाहिजे. छोटे कार्यक्रम घ्या, जेणेकरून जास्त गाड्या येणार नाही. पॉलिटिकल सभा देखील नेत्यांनी ऑनलाईन पद्धतीने करायला काही हरकत नाही. नेता ऑनलाइन बोलला तरी, कुठल्याही सभेला कार्यकर्ते गाड्या घेऊन तिथं येणार आहेत. त्यामुळे मोठ्या सभा न घेता छोट्या सभा घ्याव्यात, असे आवाहन मंत्री आठवले यांनी केलं आहे.
मंत्री आठवले यांनी, त्यांच्या शैलीत शीघ्र कविता करत विरोधकांना डिवचलं. या कवितेत लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांना मंत्री आठवले यांनी कोट केलं आहे.
मोदीजी कुछ भी अनाउन्समेंट करते है, तो अपोझिशन देते है गाली,
लेकिन नरेंद्र मोदी हे देश के वाली|
मै राहुल गांधी को बोलता हुं, बजाव तुम भी ताली,
तुम कितनी भी देते रहो गाली, मोदीजी है हमारे वाली|
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.