Narendra modi, Heeraben Modi
Narendra modi, Heeraben Modi  Sarkarnama
देश

Heeraben Modi Death : पंतप्रधानांनी घेतलं आईच्या पार्थिवाचं दर्शन, थोड्याचवेळात होणार अंत्यसंस्कार

सरकारनामा ब्यूरो

Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं शुक्रवारी(दि.30) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झालं. त्यांनी शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी हे आईच्या अंतिम दर्शनासाठी सकाळीच गांधीनगरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मातोश्री हीराबेन यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर काहीवेळातच हीराबेन मोदी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्याघरी हीराबेन यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्या निधनानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह देश विदेशातील राजकीयसह सर्वच क्षेत्रातून पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा भास व्हायचा असं म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टि्वटद्वारे श्रध्दांजली...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते जिला गमावल्याचं दुःख हे सर्वात मोठं असतं.

शरद पवार यांच्याकडून मोदींच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक

"नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरुन न येणारं नुकसाना आहे. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभो," अशा शद्बात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांचीही टि्वटद्वारे श्रध्दांजली...

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

अजित पवारांच्या शोकभावना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.स्वर्गीय हीराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT