<div class="paragraphs"><p>Narendra Modi</p></div>

Narendra Modi

 

Sarkarnama

देश

पंतप्रधान मोदींची सभा रिकाम्या खुर्च्यांमुळे करावी लागली रद्द!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा अचानक रद्द करावी लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सभास्थळी घोषणा करताना काही कारणांमुळे ही सभा रद्द करावी लागल्याचे जाहीर केले होते. तर सुरक्षेतील त्रुटींमुळे मोदींना सभेच्या ठिकाणी पोहचता आले नाही, असे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे.

आता काँग्रेसने (Congress) सभा रद्द होण्याचे कारण वेगळेच सांगितले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा रद्द केल्याचा दावा त्यांनी केला आहे. रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओही त्यांनी ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नड्डाजी, सभा रद्द होण्याचे कारण रिकाम्या खुर्च्या आहेत. विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पहा.

उगागच काहीही बोलू नका. किसानविरोधी मानसिकतेच्या सत्याचा स्वीकार करून आत्मचिंतन करा. पंजाबच्या लोकांनी सभेपासून लांब राहत अहंकाही सत्तेला आरसा दाखवला आहे, अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे. दरम्यान, आज पंजाबमध्ये पावसाळी वातावरण असून काही भागात जोरदार पाऊसही झाला आहे. त्याचाही फटका सभेला बसल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे सभेला आलेले नागरिक परत गेल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून आज विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती गृह विभागाने दिली. शहीद स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलनकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT