Bihar Politics Sarkarnama
देश

Bihar Politics: बिहारमध्ये राजकारण तापलं; भाजपाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज; एकाचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

Bihar News: बिहारमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामाने आल्यामुळे चांगलच राजकारण तापलं आहे. बिहार सरकारविरोधात भाजपाच्या आमदारांनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे बिहारमध्ये पोलीस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांना बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे भाजपाचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून यामध्ये एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. पाटणा शहरातील डाकबंगला चौक परिसरात पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला असल्याचं सुशील मोदी यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सुशीलकुमार मोदी यांच्यासह भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. सुशीलकुमार मोदी यांनी माध्यमांशी बोलताना बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत याप्रकरणी आम्ही बिहार पोलिसांवर खूनाचा गुन्हा दाखल करणार आहोत, अशा इशारा त्यांनी दिला.

बिहार सरकारच्या विरोधात भाजपाकडून आज मोर्चा काढण्यात आला होता. भ्रष्टाचार, रोजगार आणि शिक्षक नियुक्तीच्या संदर्भात भाजपाने प्रश्न उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या या प्रकारानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करत बिहार सरकारवर जोरदार टीका केली. नड्डा यांनी ट्विटद्वारे म्हटलं की, भाजपा कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज हा बिहार सरकारच्या अपयशाचा परिणाम असून बिहारच्या मुख्यमंत्र्यांना नैतिकतेचा विसर पडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT