Karanataka assembly Election
Karanataka assembly Election  Sarkarnama
देश

Karnataka Election : कर्नाटकच्या निवडणुकीला सहा राज्यांतील पोलिसांचा बंदोबस्त : वाद विसरून शेजारी मदतीला धावले...

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : सीमावाद, पाणी वाटपाचा वाद किंवा भाषावाद असला तरी निवडणूक काळात शेजारील राज्यांची मदत घेतलीच जाते. यावेळीही कर्नाटक विधानसभा निवडणूक काळात बंदोबस्तासाठी शेजारील सहा राज्यांची मदत घेण्यात आली आहे. यात आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ व गोवा येथील पोलिस बंदोबस्तसाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत. (Police deployment in six states for Karnataka assembly elections)

या सहा राज्यांमधील पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान कर्नाटकात (Karnataka) निवडणूक (Election) बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्राचाही (Maharashtra) समावेश आहे; पण महाराष्ट्रातून पोलिस (Police) पाठविण्यात आलेले नाहीत. केवळ गृहरक्षक दलाचे जवान कर्नाटकात पाठविण्यात आले आहेत. अर्थात निवडणूक काळातील या बंदोबस्ताचे नियोजन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केले जाते. त्यामुळे वाद किंवा संघर्ष असला तरी शेजारील राज्यांकडून पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी पाठवावेच लागतात.

याशिवाय विशेष दलाचे जवान व अधिकारीही कर्नाटकात पाठविण्यात आले आहेत. त्यात १९ अधीक्षक, १०७ उपअधीक्षक, १८९ निरीक्षक, २४० उपनिरीक्षक, १३० सहाय्यक निरीक्षक, २ हजार २७४ हेड कॉन्स्टेबल्स व पोलिस कॉन्स्टेबल्स यांचा समावेश आहे. विशेष दलांचे २ हजार ९६९ जण सध्या कर्नाटकात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

कर्नाटकची शेजारील राज्ये म्हणजे आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ व गोवा येथून पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील १ हजार पोलिस, तर १ हजार गृहरक्षक दलाचे जवान सध्या कर्नाटकात तैनात आहेत. तेलंगण राज्यातील ५१६ पोलिस, तर गृहरक्षक दलाचे ६८४ जवानही कर्नाटकात बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

महाराष्ट्रातून पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले नाहीत; पण महाराष्ट्राचे गृहरक्षक दलाचे तब्बल ३ हजार जवान यावेळी कर्नाटकात तैनात करण्यात आले आहेत. तमिळनाडू येथील ५०० पोलिस, तर गृहरक्षक दलाचे १ हजार जवान निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात आहेत. केरळ राज्यातून केवळ ६०० पोलिस कर्नाटकात पाठविण्यात आले आहेत. गृहरक्षक दलाचा एकही जवान पाठविण्यात आलेला नाही.

गोवा राज्यातून १०० पोलिस, तर गृहरक्षक दलाचे १०० जवान पाठविण्यात आले आहेत. शेजारील सहा राज्यांमधील एकूण २ हजार ७१६ पोलिस व ५ हजार ७८४ गृहरक्षक दलाचे जवान सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक बंदोबस्तात व्यस्त आहेत. याशिवाय कर्नाटकातील संपूर्ण पोलिस यंत्रणाही बंदोबस्तात व्यस्त आहेच.

वाद; पण निवडणुकीसाठी धावले...

महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांसोबत कर्नाटकाचा सीमावाद सुरू आहे. कावेरी पाणी वाटपावरून तमिळनाडूसोबत वाद सुरू आहे. पाणी वाटपावरून आंध्र व तमिळनाडूसोबतही वाद आहे. भाषेवरून गोव्याशी वाद सुरू आहे; पण निवडणूक काळात शेजारी मदतीसाठी धावले आहेत.

कुठून किती पोलिस कर्मचारी कर्नाटकात

-आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ व गोव्यातील पोलिसांचा समावेश

-१९ अधीक्षक, १०७ उपअधीक्षक, १८९ निरीक्षक, २४० उपनिरीक्षकांची नियुक्ती

-महाराष्ट्राचे गृहरक्षक दलाचे तब्बल ३ हजार जवान तैनात

-एकूण २ हजार ७१६ पोलिस व ५ हजार ७८४ गृहरक्षकांचा बंदोबस्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT