Jharkhand Police Lathi Charge Sarkarnama
देश

Video Police Lathi Charge : पोलिसांचा पोलिसांवरच लाठीचार्ज; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर राडा

Rajanand More

Ranchi : आंदोलन म्हटले की, पोलिसांचा खडा पहारा आलाच अन् आंदोलन आक्रमक झाले की मग पोलिसांकडून लाठीचार्जही. कधी शेतकरी, कधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तर कधी सर्वसामान्य लोकांना लाठ्या खाव्या लागतात. पण पोलिसांनीच पोलिसांवर लाठ्या चालवल्याचे कधी ऐकलंय का? शुक्रवारी असं घडलंय...

झारखंडमध्ये पोलिसांनीच पोलिस कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. राजधानी रांचीमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर हा प्रकार घडला आहे. राज्यातील विशेष पोलिस कर्मचाऱ्यांनी सोरेन यांच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांना रोखताना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

नेमकं काय घडलं?

झारखंडमध्ये विशेष पोलिस कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत त्यांचे कंत्राट संपणार आहे. यापार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी कंत्राटाची मुदत वाढवणे, नोकरीत नियमित करणे, पगारवाढ मागण्या केल्या होत्या. पण या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच एका मैदानावर कर्मचाऱ्यांचे शांततेत आंदोलन सुरू होते. त्यांचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही गेले होते. कंत्राट वाढविणे तसेच इतर काही मागण्यांवर सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांना लाठीचार्ज करून त्यांना पांगवावे लागले. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या लाठीचार्जवरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भाजपने सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली आहे. पुन्हा एकदा घाबरलेल्या हेमंत सरकारकडून झारखंडमधील युवकांवर लाठ्या चालवण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच लाठीचार्जचा व्हिडिओही एक्सवर पोस्ट केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT