Madhya Pradesh  Sarkarnama
देश

पोलिसांचा प्रताप! आधीपासून तुरुंगात असलेल्या तिघांना बनवलं रामनवमीच्या हिंसाचारातील आरोपी

भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात रामनवमीच्या दिवशी हिंसाचार झाला होता.

सरकारनामा ब्युरो

भोपाळ : भाजपची (BJP) सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) रामनवमीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी (Police) काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन जण हे मार्च महिन्यापासून तुरुंगात आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. आधीपासून तुरुंगात असणारे आरोपी रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात आरोपी कसं दाखवलं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

बरवानी जिल्ह्यात रामनवमीला हिंसाचार झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी दाखवलेले तीन आरोपी मात्र, मागील महिन्यापासून तुरुंगातच आहेत. बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथे 10 एप्रिलला दुचाकी पेटवल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका आरोपीचे घरही जिल्हा प्रशासनाने बेकायदा असल्याचे सांगून पाडून टाकले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बचावाची भूमिका घेतली आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मोठा गदारोळ सुरू झाल्यानंतर आता चौकशीचे आदेशही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

खारगोनमध्ये घरे पाडली

खारगोनमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर एका गटाने दगडफेक केली होती. या दगडफेकीचे पर्यावसान जाळपोळ व दंगलीत झाले होते. त्यामुळे खारगोनमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दंगलीत झालेले सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान दंगलखोरांकडून वसूल करण्यात येईल, असे सत्ताधारी भाजप सरकारनं म्हटलं होते. त्यानंतर, दंगलीतील आरोपींची घरे बेकायदा असल्याचे सांगत प्रशासनाने ती पाडली होती. दंगलीप्रकरणी 41 गुन्हे नोंदविले असून 144 जणांना ताब्यात घेतले आहे.

संचारबंदी शिथिल

लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येण्यासाठी खारगोनमध्ये आज संचारबंदी दोन तासांसाठी शिथिल करण्यात आली. त्यामुळे सकाळी १० ते १२ या वेळेत लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता आली. या वेळी वाहने वापरण्याची परवानगी नागरिकांना नव्हती. रहिवाशांना केवळ नजीकच्या दुकानांतून वस्तू खरेदी करण्याची परवानगी होती. फक्त दूध, किराणा, भाजीपाला आणि औषधांची दुकाने या उघडण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT