Prashant Bhushan on Sonia Gandhi Sarkarnama
देश

Sonia Gandhi Belonging Memoir : इंदिरा-राजीव गांधींच्या हत्येपासून मोदींच्या उदयापर्यंत; सोनिया गांधींच्या आत्मचरित्राने राजकारणात भूकंप होणार? प्रशांत भूषण यांचा मोठा दावा

Prashant Bhushan reacts to Sonia Gandhi memoir Belonging, recalling Indira Gandhi, Rajiv Gandhi, Congress politics and the rise of Modi-Shah : इटलीतील युवती ते काँग्रेसचे नेतृत्व; इंदिरा-राजीव गांधींच्या हत्येपासून मोदींच्या उदयापर्यंतचा प्रवास सांगत प्रशांत भूषण म्हणाले, 'कोणत्याही कादंबरीपेक्षा अधिक रंजक कहाणी!'

Pradeep Pendhare

Prashant Bhushan on Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग’वर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीच्या मोहिमेला पाठिंबा देणारे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

इटालियन युवती, आणीबाणीचा काळ, इंदिरा गांधींची सत्तेतून हकालपट्टी अन् हत्या, राजीव गांधी यांची हत्या, राजकीय आगमन, काँग्रेसचा उतरता काळ, मोदी-शाह यांचा काळ सोनिया गांधी यांना पाहिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रामुळे भारतीय राजकारणात मोठे राजकीय भूकंप येतील, यात कोणतीही शंका नाही! असा दावा प्रशांत भूषण यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे ‘बिलाँगिंग’ (Belonging) आत्मचरित्र प्रशांत भूषण यांनी वाचले नसल्याचे सांगत, पण एकदा हातात घेतल्यानंतर खाली ठेवावेसे वाटणार नाही, इतके उत्कंठावर्धक असेल, याची कल्पना येते, असे म्हटले आहे. कोणत्याही कादंबरीपेक्षाही अधिक रंजक अशी ही जीवनकहाणी असेल, असाही दावा प्रशांत भूषण यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर प्रतिक्रिया नोंदवताना प्रशांत भूषण यांनी किती विलक्षण आयुष्य आहे हे! असे सुरवातीलाच म्हटले. एका इटालियन युवतीचा भारताच्या (India) पंतप्रधानांच्या मुलाशी विवाह होतो. त्यानंतर तिला आणीबाणीचा काळ पाहावा लागतो. इंदिरा गांधी यांची सत्तेतून हकालपट्टी होते. त्यांना तुरुंगात जावे लागते आणि त्यानंतर त्या पुन्हा राजकारणात दिमाखदार पुनरागमन करतात. पुढे त्यांची हत्या होते आणि सोनिया गांधी यांच्या कुशीतच त्यांचा मृत्यू होतो! प्रशांत भूषण यांनी प्रतिक्रियेची अशी सुरूवात करून, सोनिया यांचे गांधी घरण्यातील आगमन सांगितले आहे.

यानंतर सोनिया यांचे पती राजीव गांधी देशातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या राजकीय विजयासह पंतप्रधानपदी विराजमान होतात. मात्र, पुढे त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते आणि त्यानंतर त्यांचीही निर्घृण हत्या होते, हा वेदनादायी प्रसंगाला सोनिया गांधी खंबीरपणे समोरे गेल्याचे प्रशांत भूषण यांनी सांगितले.

पाच कायदे मंजूर करून घेतले

यानंतर पुढे काँग्रेस पक्षाची वाताहत होताना पाहिल्यानंतर सोनिया गांधी अनिच्छेनेच पक्षाची सूत्रे हाती आली आणि पक्षाला पुन्हा उभारी दिली. सत्तेत पुनरागमन घडवून आणले. पंतप्रधान होण्याचा नैसर्गिक हक्क असतानाही त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी पंतप्रधानपदाचा दावा सोडला. मात्र, राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्या सर्वसामान्यांच्या हिताचे पाच महत्त्वपूर्ण कायदे मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा (RTI), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA), अन्नसुरक्षा कायदा, वनहक्क कायदा आणि नवीन भूसंपादन कायदा मंजूर करण्यासाठी केलेल्या राजकीय घडामोडींना प्रशांत भूषण यांनी उजाळा दिला आहे.

मोदी-शाह यांच्या सत्तेचा उदय

अखेर काँग्रेस पक्षाचा मानहानीकारक पराभव आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या सत्तेचा उदयही सोनिया गांधी यांना पाहावा लागतो. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपने स्वतःची एक वेगळी सांप्रदायिक फॅसिस्ट विचारसरणी देशात आणली. या संपूर्ण प्रवासात सोनिया गांधी यांना अत्यंत खालच्या पातळीवरील टीका, अपमान आणि व्यक्तिगत शेरेबाजीला सामोरे जावे लागल्याचे प्रशांत भूषण यांनी सांगितले. या सर्व घडामोडी सोनिया गांधी यांच्याभोवती घडल्या असल्याने, त्यांचे हे आत्मचरित्र भारतीय राजकारणात मोठे राजकीय भूकंप घडवेल, यात कोणतीही शंका नाही! असेही प्रशांत भूषण यांनी प्रतिक्रियेच्या शेवटी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT