

Sonia Gandhi Memoir Controversy : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या आत्मचरित्रात शीखविरोधी हत्याकांडाचा उल्लेख आला आहे. यात विसंगतपणा असल्याचे मला सांगण्यात आले आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी जे काही खोटे लिहिले गेलेले असेल, तर ते मी समोर आणेल, असे भाजप नेते एच. एस. फुल्का यांनी इशारा दिला आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्वनी कुमार यांनी आत्मचरित्रावर प्रतिक्रिया देताना, सोनिया गांधी यांचे खरे व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून समोर आले आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक वाचायला हवे, असे म्हटले आहे.
भाजप नेते एच. एस फुल्का म्हणाले, "सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आत्मचरित्रात शीखविरोधी हत्याकांडासंदर्भात उल्लेख असल्याचे मला माध्यम प्रतिनिधींचे फोन करून सांगितले. सोनिया गांधी यांनी 1984 च्या शीखविरोधी हत्याकांडादरम्यान 31 ऑक्टोबर रोजीच लष्कराला पाचारण करण्यात आल्याचे पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकात खरोखरच असा उल्लेख आहे का, हे तपासण्यासाठी मी ते विकत घेतले आहे. जर पुस्तकात असे लिहिले असेल, तर ते अधिकृत नोंदींच्या विरोधात आहे आणि सोनिया गांधी यांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे."
आयोगाच्या आणि सरकारच्या अधिकृत नोंदीनुसार, 1 नोव्हेंबरच्या सायंकाळी लष्कराला पाचारण करण्यात आले होते आणि लष्कर 2 नोव्हेंबरच्या सायंकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. मिश्रा आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले होते की, दिल्लीत लष्कराचे 5 हजार जवान उपलब्ध होते; मात्र त्यांना तैनात करण्यात आले नव्हते. हे जवान तैनात केले असते, तर 2 हजार शीख नागरिकांचे प्राण वाचवता आले असते, असेही मिश्रा आयोगाने म्हटले होते, असे भाजपचे (BJP) एच. एस. फुल्का यांनी म्हटले आहे. मी हे पुस्तक वाचणार आहे आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यात जे काही खोटे लिहिले गेले आहे, ते समोर आणणार आहे, असा इशारा फुल्का यांनी दिला आहे.
ऑपरेशन ब्लू स्टारवरील इंदिरा गांधींच्या भावनिक प्रतिक्रियेचा देखील सोनिया गांधी यांनी संदर्भ दिला आहे. त्यावर फुल्का म्हणाले, "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारनंतर अश्रू अनावर झाल्याची प्रतिक्रिया दिल्याचा उल्लेख आत्मचरित्रात करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, हे खरे वाटत नाही. सप्टेंबर महिन्यात न्यायमूर्ती तारकुंडे यांच्या पथकाने ऑपरेशन ब्लू स्टारसंदर्भात तथ्यशोधन अहवाल तयार केला होता. या अहवालात प्रत्यक्ष शवविच्छेदन अहवालाचाही समावेश होता. मात्र, संपूर्ण पथकाला अटक करण्यात आली आणि त्या अहवालावर बंदी घालण्यात आली. प्रत्यक्ष तथ्ये पाहिली, तर इंदिरा गांधी यांना कोणताही पश्चात्ताप झाल्याचे किंवा त्यांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे दिसत नाही. ते कदाचित मगरीचे अश्रू असावेत."
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्वनी कुमार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "या पुस्तकातून सोनिया गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा समोर येईल. त्यांच्यातील शांत संयम, ठाम निर्धार आणि भारत व भारतीय जनतेप्रती असलेली त्यांची संपूर्ण बांधिलकी या पुस्तकातून उलगडेल. सोनिया गांधी या व्यक्ती म्हणून नेमक्या कशा आहेत, याबाबतचे अनेक गैरसमज दूर करणारी ही कथा ठरेल. सोनिया गांधी यांचे खरे व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून समोर आले आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक वाचायला हवे.
देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार सोनिया गांधी यांना त्यांच्या आत्मचरित्रातून निश्चितच आहे. बाबरी मशीद आणि ऑपरेशन ब्लू स्टार या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होत्या. या घटनांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन या पुस्तकातून मांडण्यात आला आहे आणि तसे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. इतरांनी त्याभोवती कितीही नव्या जखमा आणि कहाण्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यामुळे इतिहासाचा प्रवाह बदलणार नाही, असेही अश्वनी कुमार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.