Jan Suraaj digital head Devpalik Gupta death news : बिहारमधील राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाशी संबंधित एका व्यक्तीचा मृतदेह झारखंडमधील रांची येथे रेल्वे रुळांजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. देवपालिक गुप्ता (वय 31) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते जन सुराज पक्षाचे डिजिटल मिडिया मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
रांची जिल्ह्यातील अंगारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जरवाडीह गावाजवळ रांची-मुरी रेल्वे मार्गावर मंगळवारी देवपालिक गुप्ता यांचा मृतदेह आढळला. रेल्वे रुळांजवळ मृतदेह सापडल्याची माहिती समोर येताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. या घटनेमुळे जन सुराज पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवपालिक गुप्ता हे रांची-पटना जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सोमवारी रांची रेल्वे स्थानकातून दुपारी सुमारे 2:25 वाजता सुटणारी ट्रेन पकडली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर जवळपास 10 मिनिटांनी त्यांनी काही खाण्यासाठी पॅन्ट्री कारमध्ये जात असल्याचे सहकाऱ्यांना सांगितले. मात्र, त्यानंतर ते परत आले नाहीत.
देवपालिक परत न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांचा संपूर्ण ट्रेनमध्ये शोध घेतला. पॅन्ट्री कारसह विविध डब्यांमध्ये तपास करूनही ते सापडले नाहीत. अखेर या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
अंगारा पोलीस ठाण्याचे प्रभारी गौतम कुमार राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात देवपालिक गुप्ता यांचा चालत्या ट्रेनमधून चुकून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास महत्त्वाचा आहे.
पोलिसांनी मृतदेह रांची येथील रिम्स रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्याची माहिती दिली आहे. तसेच कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
दरम्यान, या घटनेचा सर्व संभाव्य बाजूंनी तपास सुरू असून, देवपालिक गुप्ता यांचा ट्रेनमधून बेपत्ता होण्यापासून ते मृतदेह सापडण्यापर्यंतचा घटनाक्रम तपासला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासातून मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.