Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi Interview 2024 : '..त्यामुळेच मी म्हणतोय जे झालंय तो केवळ ट्रेलर होता'; पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

Mayur Ratnaparkhe

PM Modi Lok Sabha Election 2024 Interview : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. जनतेवर आश्वासनांचा पाऊस पडत आहे. पंतप्रधान मोदींनीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी की गॅरंटी म्हणत जनतेला विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

याशिवाय मागील दहा वर्षांत झाले तो केवळ ट्रेलर होता, असं ते विविध सभांमधून वारंवार म्हणताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टता केली आहे.

मोदी(PM Modi) म्हणाले, 'जेव्हा मी हे सांगतो की, माझ्या मनात अनेक मोठ्या योजना आहेत. कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी नाही. कुणाला दाबण्यासाठीही नाही. माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत. जनकल्याणासाठी आहेत. देशातील तुरुणांच्या आकांक्षांना मी आणखी प्रतीक्षेत राहायला लावणार नाही. मी वेळ वाया घालू इच्छित नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'अनेक सरकारांचं म्हणणं असतं ते अशा अविर्भावात असतात की आम्ही तर खूप काही केलं. आम्ही तर सगळं काही करतोय. मात्र मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही खूप काही आहे मला अजूनही करायचं आहे. कारण, मी पाहतो की माझ्या देशाला आणखी खूप काही आवश्यकता आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न कसं पूर्ण होईल, हा माझ्या मनात कायम विचार आहे. त्यामुळेच मी म्हणतो की जे झालंय तो केवळ ट्रेलर आहे. परंतु मी खूप जास्त करू इच्छित आहे,' असंही मोदींनी या वेळी सांगितलं.

याचबरोबर, '2047 व्हिजनबाबत बोलायचं झालं तर, एकतर मी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री होतो. मी हा अनुभव घेत होतो की, वारंवार निवडणुका, आचारसंहिता, कोणत्याही राज्यात निवडणूक असेल तर माझ्या राज्यातून 30-40 चांगले वरिष्ठ अधिकारी निरीक्षक म्हणून तिथे जायचे. तर 40-50 दिवस तर ते बाहेरच असायचे. तेव्हा मला ही चिंता असायची की मी सरकार कसं चालवू? कारण, देशात निवडणुकी सुरू असायच्या आणि माझे अधिकारी कायमच जायचे. तेव्हा मी हे ठरवलं की हे असं चालणार नाही. मी अधिकाऱ्यांना काम द्यायचो. मी तेव्हाही 100 दिवसांचा प्लॅन द्यायचो,' असं मोदींनी म्हटलं.

'मी मागील दोन वर्षांपासून 2047 डोळ्यांसमोर ठेवून काम करत होतो. यासाठी मी देशभऱातील लोकांकडून त्यांची मतं मागवली की, तुम्ही आगामी 25 वर्षांत भारताला कसं पाहू इच्छित आहात? मी सर्व विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था, संघटनांशी संपर्क साधला. जवळपास 15-20 लाख लोकांकडून प्रतिसाद आला आणि मग मी यामध्ये एआयचीही मदत घेतली. यावर अधिकाऱ्यांना बारकाईने काम करण्यास सांगितलं. हे मी पुढील 25 वर्षांसाठी केलं.

मी आता हा माहितीसाठी डॉक्युमेंट स्वरूपात गोळा करत आहे. जशी निवडणूक प्रक्रिया संपेल तत्काल संबंधित राज्यांना ते पाठवलं जाईल. मला वाटतं की राज्यांनी त्यावर काम करावं. मी नीति आयोगाची बैठक बोलावून यावर व्यापक चर्चा करेन आणि मग त्यानंतर यावरून एक ठोस काहीतरी निर्माण होईल,' अशी माहिती मोदींनी या वेळी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT