नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकलप्नेतून साकार झालेल्या "हुनर हाट" या अल्पसंख्यांक (Minority) समाजातील कारागीरांसाठीच्या उपक्रमाद्वारे आतापावेतो किमान साडेनऊ लाखांपेक्षा जास्त शिल्पकारांना, विणकरांना, कारागीरांना थेटपणाने रोजगार, स्वयंरोजगार मिळाले आहेत व यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी सोमवारी (ता. 25 एप्रिल) सांगितले.
मुंबईतील एमएमआरडीए ग्राउंड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या "हुनर हाट" प्रदर्शनाच्या समारोपाचा कार्यक्रम बुधवारी (ता. २७ एप्रिल) होणार आहे. मुंबईतील प्रदर्शनास आतापावेतो २० लाख लोकांनी भेट दिली असून समारोपापर्यंत ही संख्या २५ लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. त्या निमित्ताने नक्वी यांनी सागितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या हुनर हाट प्रदर्शनांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे. दिल्लीत राजपथावरील 'हुनर हाट' मध्ये पंतप्रधानांनी अल्पसंख्यांक समाजाच्या कारागीरांशी बातचीत करून लिट्टी चोखा या स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर या प्रदर्शनांना प्रतिसाद वाढला.
पंतप्रधान मोदी यांच्या "वोकल फॉर लोकल" एवं "स्वदेशीतून स्वावलंबन" या संकल्पनेतून साकारलेला हा एक सशक्त, सफल, सुदृढ व प्रभावी प्रकल्प असल्याचे सिध्द झाले आहे. मुंबईतील प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आगामी काळात गोवा, अहमदाबाद, इंदौर, भोपाळ, पाटणा, जम्मू, चेन्नई, आग्रा, प्रयागराज, जयपूर, बेंगळुरू, कोटा, सिक्कीम, श्रीनगर, लेह, शिलांग, राची, आगरतळा या शहरांतही "हुनर हाट" चे आयोजन केले जाईल. मुंबईतील हुनर हाट हे अशा प्रकारचे ४० वे प्रदर्शन होते. मुंबईतील प्रदर्शनाच्या समारोपात, हुनर हाट संकल्पना साकार करण्यासाठी आतापावेतो झटणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अधिकाऱयांचा, कलाकारांचा खास सन्मान करण्यात येणार आहे. यात सर्वश्री राकेश गर्ग, अमेजिंग लुईखाम, शैलेश, पी. के. दास; अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या सचिव रेणुका कुमार आदींचा समावेश आहे.
नक्वी यांनी सांगितले की, शतकानुशतकांची परंपरा असलेल्या देशाच्या वस्त्रोद्योग, शिल्पकला व अन्य पारंपरिक कलांना व कलाकारांना, कारागीरांना उर्जितावस्था आणण्यासाठी सुरू केलेल्या या प्रलक्पाचा लाभ लाखो गरीब कारागीरांना मिळाला आहे. या परंपरेची "प्रिझर्वेशन, प्रोटेक्शन, प्रमोशन" ही त्रिसूत्री हुनर हाटच्या माध्यमातून साकार होत आहे व प्रत्यक्षात येत आहे. आतापावेतो ज्या साडेनऊ लाख कारागीरांना हुनर हाट चा लाभ झाला त्यातील ५० टक्के महिला आहेत व यातील प्रतेयक महिला कारागीराची यशोगाथा तेवढीच प्रेरणादायी असल्याचे नक्वी म्हणाले. हनर हाटने आपली सशक्त उपस्थिती याच नावाचा ई प्लॅटफाॅर्म व वाणिज्य मंत्रालयाचे जीईएम या पोर्टलवर दाखवून दिली असून त्याचाही जबरदस्त परिणाम झाल्याचे नक्वी म्हणाले.
देशातील विशेषतः अल्पसंख्यांक समाजातील कुशल कारागीरांना सन्मानासह रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणून हुनर हाट प्रकल्पाने स्वतःला सिध्द केलेल्याचे विश्लेषक सईद अंसारी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.