Narendra Modi, Latest News Sarkarnama
देश

PM Narendra Modi : २०२४ च्या निवडणुकीसाठी मोदींचा नवा मंत्र; गावागावात जा आणि...

PM Narendra Modi News : २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती

सरकारनामा ब्यूरो

PM Narendra Modi News : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मात्र लगेच भाजपने पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलीय. याबाबत नरेंद्र मोदींनी २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना नवा मंत्र दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने पुढच्या वर्षातील विधानसभा निवडणुका व २०२४ ची लोकसभा रणधुमाळी यांचे मंथन दिल्लीत सुरू केले. अहमदाबादमध्ये (Ahmedabad) मतदान करून थेट पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात दाखल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

विशेषतः सीमेवरील गावागावांत एक रात्र तरी मुक्कामी राहून भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमानस' समजून घेण्याचा प्रयत्न करावा व देशाच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्यासाठी ‘स्नेहमीलन' मोहीमा राबवाव्यात, अशा सूचना मोदींनी केल्या.

एक निवडणूक संपली की नेत्यांनी ‘श्रमपरिहार' करण्यासाठी रवाना व्हायचे ही राजकीय संस्कृती मोडून काढण्यात मोदी युगातील भाजपचे प्राधान्य आहे. या दोन दिवसांच्या राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीतही त्याची चुणूक दिसली. गुजरातचे मतदान मार्गी लागताच भाजपने आगामी विधानसभा व मिशन २०२४ च्या तयारीला वेग दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आज भाजप राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन केले. या दोन दिवसीय बैठकीत भाजप राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करणार आहे. यासह बूथ सक्षमीकरणासह विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटन सरचिटणीस, राज्य प्रभारी, आघाड्यांचे प्रभारी सहभागी होत आहेत.

बैठकीची माहिती देताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.रमण सिंह म्हणाले, ''पंतप्रधानांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आज देश जागतिक स्तरावर आर्थिक शक्ती म्हणून कसा उदयास आला आहे हे सांगितले''.

भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी सीमावर्ती गावांशी (व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज) संपर्क वाढवला पाहिजे. या ग्रामस्थांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या गावात रात्रीचा मुक्काम करावा, असेही मोदी यांनी आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT