Education Minister prediction : कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. आता पूर्णवेळ शिक्षणमंत्री कोण असणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे बोट दाखविले आहे.
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या नावावर फुली मारत थेट कॉर्पोरेट जगतातील प्रसिध्द नाव पुढे केले आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये चव्हाण यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांना लवकरच पूर्णवेळ शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती करावी लागेल. देशभरात स्वीकारार्ह असा, जनरेशन 'जेन झी'सोबत संवाद साधू शकणारा, शिक्षण व्यवस्था सुधारू शकणारा आणि शिक्षणासाठी अधिक निधी मिळवून देऊ शकतो, अशा व्यक्तीची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले आहेत.
सध्याच्या मंत्रिमंडळात अशी एकही व्यक्ती नसल्याचे सांगत चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही जेन झी किंवा काँग्रेस स्वीकारणार नाही, असे सांगितले आहे. फडणवीसांचे नाव पुढे आल्यास काँग्रेसचा कडाडून विरोध असेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांनी नीट पेपरफुटीमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरही संशय व्यक्त केला आहे.
सत्ताधारी नेत्यांचा संबंध?
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक कोचिंग क्लास आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांची नावे समोर आल्याचे सांगत चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत विश्वास वाटणार नाही. राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही राजकीय नेत्यांचाही या प्रकरणाशी संबंध होता का, असा थेट सवाल चव्हाणांनी केला आहे. हा संबंध होता की नाही, हे केवळ विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीतच समोर येईल, असे सांगत चव्हाण यांनी पेपरफुटीशी थेट सत्ताधारी नेत्यांचे कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
सत्ताधारी नेत्यांवर संशय
सध्याच्या स्थितीत शिक्षणमंत्रिपदावर एखाद्या शिक्षणतज्ज्ञाची किंवा वरिष्ठ नोकरशहाची किंवा माजी कुलगुरूंची—निवड केली जाण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी उच्च शिक्षण व्यवस्थेत आरएसएसशी संबंधित लोकांचा भरणा असल्याचा आरोपही केला आहे. महत्वाच्या पदांवरील बहुतेक जण सामान्य दर्जाचे असल्याचा आरोप केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नवे शिक्षणमंत्री कोण?
पोस्टच्या शेवटी त्यांनी अशावेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचा विचार होऊ शकतो, असे सांगत थेट नंदन निलकेणी यांचे नाव घेतले आहे. निलकेणी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत.
निलकेणी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बंगळूर दक्षिण मतदारसंघातून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांचा तब्बल दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. भाजपचे उमेदवार अनंत कुमार यांनी निलकेणी यांना पराभूत केले होते. निलकेणी यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून काढता पाय घेतला. या पराभवानंतर निलकेणी यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.