Parliament protest update : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीसोबत विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. प्रधान यांच्या राजीनामा झाल्याशिवाय संसदेत पेपरफुटीवर चर्चा होऊ दिली जाणार नाही, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले आहे. विरोधकांच्या या भूमिकेविरोधात भाजपसह एनडीएतील अन्य पक्षाचे खासदारही आक्रमक झाले आहेत.
संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी आवारात इंडिया आघाडीने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणापासून काही अंतरावरच एनडीएच्या खासदारांनीही आंदोलन केले. संसदेमध्ये नीट पेपरफुटीवर चर्चा व्हावी, अशी एनडीएच्या खासदारांची मागणी होती. त्यामध्ये भाजपचे खासदार अधिक आक्रमक होते.
संसदेच्या मकरद्वार परिसरात भाजपचे खासदार घोषणाबाजी देत असतानाच तिथे काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी अन्य महिला खासदारांसोबत आल्या. भाजपच्या खासदारांसमोरच त्यांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रियांका गांधी तिथून निघून गेल्या.
दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. राजीनाम्याशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका घेतल्याने कामकाज तहकूब करावे लागले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना सरकार दोन्ही सभागृहात चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. पण काँग्रेसकडून त्यासाठी अटी घातल्या जात असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
सलग चौथ्या दिवशीही संसदेचे कामकाज सुरळीतपणे सुरू होऊ शकलेले नाही. तर जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीला मिळणार पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. मात्र, प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय सीजेपी आणि विरोधक मागे हटायला तयार नसल्याने ही कोंडी कशी फुटणार, याबाबत अनिश्चितता वाढत चालली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.