Rahul Gandhi protest : राहुल गांधींनी फिरवलं राजकारण! काँगेसच्या मनासारखं घडलं... एक घटना ठरली गेमचेंजर

PM Modi residence, Narendra Modi : सीजेपीच्या आंदोलनापासून चार हात लांब राहिल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोदी सरकारला थेट आव्हान देत विरोधी राजकारणाला नवा आक्रमक चेहरा दिला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress politics : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेससह अन्य राजकीय पक्षातील नेत्यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा पवित्रा घेत सरकारला अनपेक्षित धक्का दिला. कारण मागील १२ वर्षांत विरोधकांनी पहिल्यांदाच हा मार्ग अवलंबला. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोमवारच्या संसद मार्चमध्ये पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर धडक देत विरोधकांनी आपला इरादा स्पष्ट केला.

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाने राहुल गांधी यांनी एका दगडात दोन नव्हे तर अनेक पक्षी मारले आहेत. खरंतर कालच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घडामोडी अगदी काँग्रेसला हव्या तशा घडल्या, असेच म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे प्रामुख्याने राहुल गांधी यांची मधल्या काळात आंदोलनाशी संबंधित धार कमी झाली होती. त्याला पुन्हा एकदा आक्रमक स्वरुप मिळाले आहे. या आंदोलनातून राहुल यांनी संपूर्ण राजकारणचं फिरवलं, असंच म्हणावं लागेल.

खरंतर कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर येण्याआधीपासून राहुल गांधी यांच्याकडून नीट पेपरफुटी व शिक्षणाशी संबंधित इतर मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. छात्रों की गुंज या माध्यमातून त्यांनी देशभरातील युवकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली होती. पण अनेक दिवस परदेशात गेल्याने त्यांच्या हातून हा मुद्दा निसटत गेला. दुसरीकडे जंतरमंतरवर आंदोलन सुरू करत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी संपूर्ण देशातील युवकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

Rahul Gandhi
NDA expansion : ओमराजे, सायोनी घोष अन् राघव चड्ढा यांचे सूर जुळले! 4 महिन्यांतील सर्वात मोठे धक्के...

परदेशातून परतेपर्यंत राहुल गांधी यांच्या हातून हा मुद्दा निसटला होता. काँग्रेसने सीजेपीच्या आंदोलनाची दखलही घेतली नव्हती. मागील आठवड्यात पक्षाचे नेते पवन खेडा यांनी उपोषणाला बसलेल्या वांगचूक यांची भेट घेत विचारपूस केली होती. एवढाच काय तो काँग्रेसचा पुढाकार. काँग्रेस आणि प्रामुख्याने राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून वांगचूक यांचे उपोषण, सीजेपीच्या आंदोलनावरून आपली भूमिका स्पष्ट करावी, आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियात रंगली होती. पण राहुल गांधी आणि काँग्रेस सीजेपीपासून जाणीवपूर्वक चार हात लांब राहिले. त्यामागेही राजकीय कारण होते.

सोमवारच्या संसदेवरील मोर्चामध्ये दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मात्र राजकारण पेटलं अन् काँग्रेस, राहुल गांधींना एक आशेचा किरण दिसला. थेट जंतरमंतरवर जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला राजकीय रंग येऊ न देण्याची काळजी घेत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाची निवड केली. खरंतर ही राजकीय चाल म्हणावी लागेल. पंतप्रधानांचे निवासस्थान हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. तिथे आंदोलन करत मीडियासह सरकारचेही लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. तो यशस्वीही झाला. पोलिसही त्यास कारणीभूत ठरले.

Rahul Gandhi
CJI Surya kant : सरन्यायाधीश सूर्यकांत 'त्या' 800 प्रकरणांबाबत गंभीर; चार न्यायाधीशांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधींसह काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतले. राहुल यांना ताब्यात घेताना मोठा संघर्ष झाला. राहुल गांधी रस्त्यावर झोपले होते. त्यांना उचलून नेण्यासाठी पोलिसांना प्रचंड धडपड करावी लागली. या धरपकडीत राहुल यांच्या नाकातून रक्त आले. त्यामुळे काँग्रेस नेते अधिक आक्रमक झाले. नाकातून आलेले रक्त त्यांच्या टी-शर्टवरही सांडले होते. राहुल यांचे पकडे मळले होते. या धावपळीत त्यांचा एक शूजही पायातून निसटला होता. ही संपूर्ण घडामोड राहुल गांधी आणि काँग्रेससाठी महत्वाची ठरली.

एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा यातून बनविली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मोदी सरकारमधील मंत्र्‍यांनाही रस्त्यावर येऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणे भाग पडले. एकदा नव्हे दोनदा हे मंत्री रस्त्यावर येऊन राहुल यांच्याशी बोलले. इथेच या आंदोलनाचे महत्व अधोरेखित होते. काँग्रेसलाही हेच अपेक्षित असणार. अनेक दिवस परदेशात गेल्याने राहुल यांच्यावर बरीच टीका झाली. मंगळवारच्या आंदोलनाचे फोटो, व्हिडिओ पाहून राहुल यांच्याविषयीचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

Rahul Gandhi
CJP Delhi protest : दिल्लीतील हिंसाचार खटकला; मोदी सरकारमधील मंत्रीही 'सरकारी' भूमिकेविरोधात पहिल्यांदाच थेट बोलले...

जंतरमंतरवरील आंदोलनासोबत काँग्रेसच्या या आंदोलनाला सोशल मीडियातूनही बराच प्रतिसाद मिळाला. आता विरोधाची ही धार कमी न होऊ देता सरकारला घेरण्याची राहुल यांची पुढील रणनीती नेमकी काय असणार, सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का, कॉक्रोच जनता पार्टीला काँग्रेस उघडपणे पाठिंबा देणार का, आदी प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com