Parliament political meeting Sarkarnama
देश

PM Modi Priyanka Gandhi : लोकसभेतील वादळी चर्चेनंतर पहिल्यांदाच PM मोदींसमोर आल्या प्रियांका गांधी; सुप्रिया सुळे, लंकेंचीही उपस्थिती, काय झाली चर्चा?

Lok Sabha debate : चहापानाचे फोटो समोर आल्यानंतर विरोधक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Rajanand More

Parliament political meeting : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गुरूवारी विकसित भारत-रोजगार हमी व आजिवीका विधेयक (ग्रामीण) मंजूर झाले. जोरदार गदारोळ विधेयक पारित झाल्यानंतर संसदेबाहेर विरोधकांनी आंदोलन करत सरकारवर टीकेची झोड उठविली. त्यामुळेच आजचा अधिवेशनाचा अखेरचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता होती. मात्र, कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

परदेश दौऱ्याहून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज लोकसभेत उपस्थित होते. कामकाज तहकूब झाल्यानंतर प्रथेप्रमाणे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय चहापान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके यांच्यासह अन्य पक्षांचे खासदारही उपस्थित होते.

चहापानाचे फोटो समोर आल्यानंतर विरोधक आणि पंतप्रधान मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला होता. त्यानंतर प्रियांका गांधी यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जी-राम-जी बिलावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने होते.

लोकसभेतील या घडामोडींनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी समोरासमोर आले. ‘आज तक’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांमध्ये प्रियांका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाशी संबंधित चर्चा झाली. लोकसभेतील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील आजचा संवाद अत्यंत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

काही खासदारांनी रात्री उशिरापर्यंत विधेयक पारित करण्याच्या भूमिकेवर पंतप्रधानांसमोर चिंता व्यक्त केली. अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढविण्याची मागणी विरोधकांकडून आधीपासूनच केली जात होती. त्याबाबतच खासदार बोलले. त्याचप्रमाणे विरोधकांच्या सातत्याने होत असलेल्या गदारोळामुळेही अधिवेशनाचे कामकाज कमी झाल्यावरूनही चहापानादरम्यान चर्चा झाली.

पंतप्रधान मोदींनी यावर विरोधकांचे मिश्कील शब्दांत कान उपटले. विरोधकांच्या आवाजावर फार ताण पडू नये, असे वाटत होते, असे मोदी मोदी म्हणाले. त्यावर खासदारांनीही हसून दाद दिली. लोकसभेती आरोप-प्रत्यारोपांनंतर आजच्या औपचारिक चर्चेत सर्वच पक्षांच्या खासदारांच्या उपस्थितीने वातावरण खेळीमेळीचे बनले होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT