Priyanka Gandhi, Pralhad Joshi Sarkarnama
देश

Parliament update : प्रियांका गांधींनी नव्या शिक्षणमंत्र्यांवर घातला जिव्हारी लागणारा घाव; प्रल्हाद जोशींची तळपायाची आग मस्तकात गेली

Priyanka Gandhi, Pralhad Joshi, Education Minister, : लोकसभेत पेपरफुटी विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा प्रल्हाद जोशींवर थेट हल्ला; बिल्कीस बानो प्रकरणातील जुन्या विधानावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.

Rajanand More

Parliament Session News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे मागील आठवडाभराचे कामकाज वाया गेले होते. अखेर मंगळवारी सुरळीतपणे कामकाजाला सुरूवात झाली. सरकारकडून सोमवारी सादर करण्यात आलेल्या पेपरफुटी विरोधातील सुधारित विधेयकावर सुरू झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी थेट नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या एका विधानामुळे लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी जोशींना त्यांच्या एका जुन्या विधानावरून घेरले. त्या म्हणाल्या, पंतप्रधानांनी नवीन शिक्षणमंत्री आणले. त्यांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या सुटकेवर आनंद व्यक्त केला होता. कोट्यवधी लोकांना पंतप्रधान मोदींनी काय संदेश दिला?

प्रियांका गांधी यांच्या या विधानावर भाजपचे खासदार चांगलेच भडकले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विधानावर आक्षेप घेत ही एकप्रकारे मानहानी असल्याने ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, असे म्हटले. तसेच त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी रिजिजू यांनी केली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही नियमांचा हवाला देत तथ्य प्रमाणित केल्याशिवाय बोलू नये, असे बजावले. त्यावर प्रियांका यांनीही प्रल्हाद जोशी यांनी बिल्कीस बानो यांच्याविषयी जे विधान केले होते, ते प्रमाणित करेन, असे स्पष्ट केले.

प्रल्हाद जोशी आणि भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी मात्र आधी प्रमाणित करावे, मगच बोलू द्यावे, अशी मागणी केली. चुकीची माहिती दिली जात आहे. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांनी प्रमाणित करायला हवे. मला आरोपांबाबत कसलीही नोटीस दिली नाही. मी त्याचे खंडन करतो. त्यांनी त्याबद्दल माफी मागायला हवी, असे संतापलेले जोशी म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे आरोप प्रमाणित करण्याची तयारी दर्शविली. पण अध्यक्षांनी त्यांना थांबवत केवळ विधेयकावर बोलण्याचा आग्रह केला. त्यानंतर हा वाद शांत झाला आणि प्रियांका गांधी यांनी विधेयकावर बोलण्यास केली. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सल्लागार बदलावा, असा निशाणा साधला. संसदेत विरोधकांना दोषी धरत, पोकळ राजकीय खेळ खेळून काम चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT