Punjab Politics News: पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या (2027) विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाने 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
समाना आणि सनौर मतदारसंघातील दोन आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर अमृतसर नॉर्थचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनीही थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत तीन आमदारांच्या राजीनाम्यांमुळे पंजाबमधील आपसमोरील आव्हाने वाढली आहेत.
कुंवर विजय प्रताप यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पंजाब विधानसभा अध्यक्षांकडे हे पत्र ई-मेल, व्हॉट्सॲप आणि टपालाच्या माध्यमातून पाठवले आहे.पक्षाच्या नेतृत्वाला किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. 1 नोव्हेंबरपासून आपण सभागृहाचे सदस्य राहणार नसल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आता विधानसभा अध्यक्ष या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
कुंवर विजय प्रताप यांनी राजीनाम्याच्या पत्रात त्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर अमृतसरच्या नागरिकांना उद्देशून संदेश देताना त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. जनतेकडून मिळालेले प्रेम आणि सन्मान याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार म्हणून काम करताना आपण निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी 90 टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्याचा दावाही त्यांनी केला.
पंजाबमधील अमली पदार्थांचे जाळे, खंडणी, गँगस्टरवाद आणि भ्रष्टाचार या समस्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. या आव्हानांतून राज्याला बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंवर विजय प्रताप हे माजी आयपीएस अधिकारी असून 1998 च्या पंजाब कॅडरचे अधिकारी आहेत. जून 2025 मध्ये पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून आम आदमी पक्षाने त्यांना निलंबित केले होते. आमदार म्हणून त्यांनी अमृतसरमधील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कंपनी बाग, सर्किट हाऊस, गुरु नानक देव विद्यापीठ, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि बरगाडी बेअदबी प्रकरणासारखे मुद्दे विधानसभेत उपस्थित केले होते.
समाना मतदारसंघाचे आमदार चेतन सिंह जौडामाजरा आणि सनौरचे आमदार हरमीत सिंह पठानमाजरा यांनी रविवारी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दोघेही आज (2 नोव्हेंबर) दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. पठानमाजरा यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे.
पंजाबच्या हितांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आणि दिल्लीतील नेतृत्वाकडून राज्याचे राजकारण चालवले जात असल्याचा आरोप या दोन्ही आमदारांनी आप नेतृत्वावर केला आहे.
आम आदमी पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. समाना आणि सनौर या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी तेथे नवीन मतदारसंघ प्रभारी नियुक्त करण्यात आले होते. समाना येथे सुरजीत सिंह रखडा, तर सनौरमध्ये रंजोध हडाना यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
निवडणुकीला अद्याप अवधी असतानाच पक्षातील तीन आमदारांच्या राजीनाम्यांमुळे आपच्या संघटनात्मक एकजुटीची परीक्षा सुरू झाली आहे. आगामी काळात आणखी कोणते नेते पक्षाची साथ सोडतात आणि या नाराजीचा 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.