Ashwani Sekhdi Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसला पुन्हा झटका;आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सेखडी हे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. सिद्धू यांनीच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सेखडी यांना बटालामधून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती.

सरकारनामा ब्यूरो

Punjab News : एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते देशपातळीवर विरोधी पक्षांची एकजूट करत असताना दुसरीकडे एका पाठोपाठ एक पक्षाचे नेते काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्ध यांच्या गटातील अश्वनी सेखडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमधून आलेले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनलेले सुनील जाखड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. (Punjab Congress leader Ashwani Sekhdi joins BJP)

दरम्यान, पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिला होता. काही महिन्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हेही काँग्रेसमधूनच आलेले आहेत. त्यानंतर आता अश्वनी सेखडी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अश्वनी सेखडी यांच्या भाजप प्रवेशाने पंजाब काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सेखडी हे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. सिद्धू यांनीच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सेखडी यांना बटालामधून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. तसेच सेखडी यांच्यासाठी सिद्धू यांनी रॅली आणि सभा घेऊन जोरदार प्रचार केला होता. मात्र, त्याच सेखडी यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने सिद्ध गटाला मोठा धक्का बसला आहे. सेखडी यांचे चंदीगड येथील भाजपच्या कार्यालयात स्वागत करण्यात आले.

भाजप प्रवेशानंतर सेखडी म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या पक्षात सामील होताना आज खूप आनंद होत आहे. मला भाजपत कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मला पंजाबच्या जनतेची सेवा करायची आहे. भारतीय जनता पक्षाचा एका सच्चा सैनिक म्हणून मी काम करत राहील. बटाला भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे मला या ठिकाणी पोचायला वेळ लागला.

यावेळी सेखडी यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता प्रतिभावान नेत्यांना स्थान राहिलेले नाही. त्यामुळे सुनील जाखड यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रतिभावंत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, सेखडी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT