Punjab Police | Shiv Sena Leader | Heroin Case Sarkarnama
देश

Shivsena Leader : शिवसेना नेत्याला अडकवण्यासाठी पोलिसानेच घरात ठेवले अमली पदार्थ : CCTV फुटेजमुळे समोर आला धक्कादायक कारनामा

Shivsena Leader Mahant Kashmir Giri : सीआयए स्टाफमध्ये कार्यरत असलेला एएसआय सुखदेव सिंह हा पोलिसांच्या अधिकृत पथकाच्या येण्यापूर्वी साध्या वेशात महंत काश्मिरी गिरी यांच्या घरी पोहोचला होता. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये तो एका खोलीत जाताना आणि बेडवरील गादीखाली काहीतरी ठेवताना दिसत आहे.

Jagdish Patil

Punjab Police Heroin Case : पंजाबमधील खन्ना येथे पोलीस विभागाला हादरवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिवसेना नेत्याला अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच त्याच्या घरातील गादीखाली हेरॉइन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांची छापेमारी होण्यापूर्वीची ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या रेकॉर्डिंगमुळे पोलीस कर्मचाऱ्याची पोलखोल झाली आहे. त्यानंतर संबंधित एएसआयला निलंबित करण्यात आले असून, शिवसेना नेते महंत काश्मिरी गिरी यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांविरोधात मोहीम सुरू असतानाच खन्ना येथील खटीकां चौक परिसरात हा प्रकार घडला.

शिवसेना नेते महंत काश्मिरी गिरी यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकून हेरॉइन जप्त केल्याचा दावा केला होता. या कारवाईनंतर गिरी यांना अटक करण्यात आली होती. मात्र, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयए स्टाफमध्ये कार्यरत असलेला एएसआय सुखदेव सिंह हा पोलिसांच्या अधिकृत पथकाच्या येण्यापूर्वी साध्या वेशात महंत काश्मिरी गिरी यांच्या घरी पोहोचला होता. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये तो एका खोलीत जाताना आणि बेडवरील गादीखाली काहीतरी ठेवताना दिसत आहे.

काही वेळानंतर सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजयपाल सिंह, सिटी पोलीस ठाणे क्रमांक दोनचे प्रभारी तरविंदर कुमार बेदी आणि इतर पोलीस कर्मचारी महंत काश्मिरी गिरी यांना घेऊन त्याच खोलीत पोहोचले. यावेळी केलेल्या झडतीत गादीखालून सुमारे ३० ग्रॅम हेरॉइन जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आणि महंत गिरी यांना अटक केली.

या प्रकरणात सुरुवातीला महंत काश्मिरी गिरी यांचा चालक गुरजंट सिंह जंटा याला साडेसात ग्रॅम हेरॉइनसह अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्याची चौकशी केल्यानंतर महंत गिरी यांचे नाव समोर आले आणि त्यानंतर पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, घरातील CCTV रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर हेरॉइन जप्त करण्याच्या संपूर्ण कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेचे रेकॉर्डिंग समोर येताच खन्नाच्या एसएसपी डॉ. दर्पण आहलुवालिया यांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी संबंधित एएसआय सुखदेव सिंह याला निलंबित केले असून, संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. दरम्यान, महंत काश्मिरी गिरी यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली. मात्र, पोलिसानेच एका नेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी कट रचल्याचं समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT