Punjab government confidence motion : आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. या सातपैकी सहा खासदार हे पंजाबमधील आपच्या आमदारांनी निवडून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठीही हा मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता आपचे राज्यातील आमदारही फुटणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच मान यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.
आपच्या सात खासदारांपाठोपाठ जवळपास ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे आपचे सरकार कोसळू शकते, असे तर्कवितर्क लढविले जाऊ शकते. यापार्श्वभूमीवर भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतल्याचे समजते.
मान यांनी ता. १ मे रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. या अधिवेशन सरकारकडूनच विश्वासदर्शक ठराव मांडला जाऊ शकतो. या माध्यमातून आप आमदारांची एकजुट दाखविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर नियमानुसार पुढील सहा महिने सरकारला कोणताही धोका नसेल. विरोधकांना सरकारविरोधात अविश्वास ठराव आणता येणार नाही.
आपचे आमदार फुटले तरी मान हे सहा महिने मुख्यमंत्री राहतील, अशी त्यामागची रणनीती असल्याची चर्चा आहे. पंजाबमधील पुढीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता तोपर्यंत सरकार टिकविण्यासाठी मान प्रयत्नशील असल्याचे दिसते.
विशेष अधिवेशनानंतर चार दिवसांनी म्हणजेच ५ मे रोजी भगवंत मान थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे आमदारही असतील. मात्र, आमदारांना राष्ट्रपतींनी भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे केवळ आपणच राष्ट्रपतींना भेटणार असून आमदार बाहेर थांबतील, अशी माहिती मान यांनी सोशल मीडियातून दिली आहे.
भगवंत मान यांच्याकडून राष्ट्रपतींकडे सात खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा मांडला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीतून मान यांना तसा थेट कोणताही राजकीय फायदा मिळणार नसला तरी एक सूचक संदेश म्हणून या भेटीचा दाखला त्यांच्याकडून दिला जाऊ शकतो. विश्वासदर्शक ठरावानंतर ही भेट होत असल्याने त्याचे महत्व वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.