बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सरकारने राबडी देवी आणि त्यांच्या परिवाराकडून दोन महत्त्वाचे सरकारी बंगले परत घेतले असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राबडी देवी यांच्याकडून पटण्यातील 10, सर्कुलर रोड येथील 20 वर्षे वापरात असलेला बंगला परत घेण्यात आला आहे. हा बंगला त्यांना पूर्व मुख्यमंत्री म्हणून दिला गेला होता आणि नंतर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून तो त्यांच्या नावावर ठेवला गेला होता. मात्र नवीन सरकारने हा बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. आता राबडी देवी यांना 39 हार्डिंग रोड येथे नवीन सरकारी निवास देण्यात आला आहे. हा बंगला कायमस्वरूपी विरोधी पक्षनेत्यांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच लालू यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनाही याचा फटका बसला आहे. त्यांच्याकडील 26 एम स्टँड रोडवरील सरकारी बंगला आता परत घेण्यात आला असून तो भाजपा कोट्यातील मंत्री लखेंद्र पासवान यांना देण्यात आला आहे. तेज प्रताप यांनी हा बंगला ताबडतोब रिकामा करावा, असे भवन बांधकाम विभागाने आदेशात म्हटले आहे. लालू परिवारातील दोन सदस्यांकडून एकाच वेळी निवास परत घेण्यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तेजस्वी यादव यांच्यावरही या कारवाईचा परिणाम दिसणार आहे. जरी त्यांना विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून 1, पोलो रोड येथील बंगला देण्यात आला असला, तरी ते प्रामुख्याने आपल्या आई-वडिलांसोबत 10, सर्कुलर रोडवरच राहत होते. त्यांचा पोलो रोडचा बंगला प्रामुख्याने कार्यालय आणि त्यांच्या सहाय्यकांच्या निवासासाठीच वापरला जातो. त्यामुळे आता 10, सर्कुलर रोडचा बंगला रिकामा केल्यानंतर लालू, राबडी, तेजस्वी आणि संपूर्ण परिवाराला 39 हार्डिंग रोड येथे स्थलांतर करावे लागणार आहे.
दरम्यान, नीतीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील सर्व 26 मंत्र्यांना नवीन सरकारी निवासस्थानांचे वाटपही करण्यात आले आहे. जुन्या मंत्र्यांपैकी 13 जणांना त्यांचे पूर्वीचेच बंगले देण्यात आले, तर उर्वरित 13 नवीन मंत्र्यांना वेगवेगळे बंगले वाटप केले गेले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत लालू परिवारावरील कारवाईमुळे बिहारमधील बदललेले राजकीय समीकरण स्पष्टपणे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.