Raghav Chadha News : खासदार राघव चड्ढा यांची आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. चड्ढा यांनी सोशल मीडियातून थेट आम आदमी पक्ष नेतृत्वावरच हल्लाबोल केला. 'मेरी खामोशी को मेरी हार ना समझ लेना, मैं वो दरिया हूँ, जो वक्त आने पर सैलाब बनता है', अशा शेरोशायरीतून त्यांनी केजरीवाल यांना सूचक इशारा दिला. यावर आता आम आदमी पक्षही मैदानात उतरला असून राघव चड्ढा यांनी भाजपसोबत केलेल्या कथित सेटलमेंटचे दावे करत पक्षातील नेत्यांनी चड्ढा यांच्यावर टीका केली.
आम आदमी पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज म्हणाले, राघव चड्ढा यांनी स्वतःचा पीआर थांबवून जनतेचे खरे मत मांडले पाहिजे. आम आदमी पक्षाचे संसदेतील सदस्य कमी आहेत, त्यामुळे पक्षाला मिळणारा वेळ मर्यादित आहे. या मिळालेल्या वेळेत राष्ट्रहिताचे महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले पाहिजेत. राष्ट्रीय प्रश्नांना, संवेदनशील राजकीय मुद्द्यांना प्राधान्य दिले पाहिजे. केंद्रातील सरकारविरोधात अनेकदा आक्रमक भूमिका घेतली जाणे अपेक्षित असते, पण कमी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलून त्यातून जनहित साध्य होत नाही, अशीही टीका भारद्वाज यांनी केली.
आम आदमी पक्षाचे नेते चड्ढा यांच्या संसदेतील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचेही भारद्वाज यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अलीकडेच संसदेत महाभियोग प्रस्ताव आणला आहे. पण चड्ढा यांनी यावर सही करण्यास नकार दिला होता. चड्ढा यांनी विरोधी पक्षांसोबत आंदोलनांमध्येही भाग घेतला नाही. अरविंद केजरीवाल यांच्यासह 'आप'च्या अनेक नेत्यांवर कायदेशीर कारवाई होत असताना पक्ष एका नाजूक टप्प्यावर होता. त्यावेळी चड्ढा परदेशात लपून बसले होते. त्यांनी पक्षासोबत उभे राहणे अपेक्षित होते आणि संसदेत जोरदारपणे मुद्दे मांडणे गरजेचे होते, असेही मत भारद्वाज यांनी व्यक्त केले.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनुराग धांडा यांनीही खासदार चड्ढा यांच्यावर हल्लाबोल केला. चड्ढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यास घाबरत होते. देशाचे खरे प्रश्न मांडण्यास घाबरत होते. त्यांनी संसदेतील वेळ राष्ट्रीय प्रश्न मांडण्याऐवजी समोशांवर चर्चा करण्यात वाया घालवला होता. पक्षाला बोलण्यासाठी मर्यादित वेळ मिळतो आणि तो वेळ महत्त्वाचे राष्ट्रीय प्रश्न मांडण्यासाठी वापरला पाहिजे. त्या वेळेत, विमानतळावरील कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करण्याबद्दल ते बोलत होते. चड्ढा यांनी किती वेळा पक्षासोबत उभे राहण्यास नकार दिला आणि वेगळी भूमिका घेतली, याचीही त्यांनी यादी दिली.
राघव चड्ढा यांनी कोणकोणत्या मुद्दांवर मौन बाळगले?
राघव चड्ढा यांनी संसदेत एलपीजी संकट, नोकरकपात, परराष्ट्र धोरण, वाढत्या इंधन किमती, आयटी नियमांमधील सुधारणा, शेअर बाजारातील मोठी घसरण, सोशल मीडियामध्ये व्यक्त होण्यावर निर्बंध, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, विरोधी पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे एफआयआर अशा विविध मुद्द्यांवर बोलणे आम आदमी पक्षाला अपेक्षित होते. पण राघव चड्ढा यांनी 28 दिवसांचा मोबाईल रिचार्ज, बँक अकाऊंट्समधील मिनिमम बॅलेंन्स, पॅटर्निटी लिव्ह, यूरिया आणि अन्य भेसळीसह विमानतळावरील महागडे पदार्थ असे मुद्दे मांडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.