Amit Shah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Parliament debate : राहुल गांधींनी स्वत:लाच सापळ्यात अडकविले..! थेट अमित शहांना भिडल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला

Rahul Gandhi, Amit Shah, Kiren Rijiju : लोकसभेत पेपरफुटी विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहांवर गंभीर आरोप करून राहुल गांधींनी सत्ताधारी खासदारांना चिथावणी; किरेन रिजिजूंकडून पुराव्यांची मागणी आणि प्रत्युत्तर.

Rajanand More

Parliament update : लोकसभेत पेपरफुटी विरोधी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठीचार्जचा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच दिला होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विधानावर नाराजी व्यक्त करत प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत अमित शहांवर जोरदार हल्ला चढविला. संसदेत येण्याची शहांमध्ये हिंमत नसल्याची टीका राहुल यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी मूर्ख, अंधभक्त असे शब्द उच्चारले. यावरून सत्ताधारी खासदारांनी जोरदार हंगामा केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांना यांच्याकडे शहांवरील आरोपांचे पुरावे मागितले.

कोणत्याही पुराव्याशिवाय गंभीर आरोप करणे योग्य नाही. असे होत राहिले तर मीही म्हणू शकतो की, राहुल गांधी यांनी कुणाचा तरी खून केला आहे, असे संतापलेले रिजिजू म्हणाले. संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर मीडियाशी बोलताना रिजिजू यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्यावर आम्ही दोन कारणांमुळे अत्यंत नाराज आहोत. त्यांनी पेपरफुटी प्रतिबंधक विधेयकावर एकही ठोस मुद्दा मांडला नाही. असंसदीय शब्दांचा वापर करून सभागृहाची दिशाभूल केली आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर चुकीचे आरोप केल्याचे रिजिजू म्हणाले.

गृहमंत्री किंवा इतर कोणताही मंत्री गोळीबाराचे आदेश देत नाहीत, असे सांगत रिजिजू म्हणाले, असे आदेश देण्याचा अधिकार मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात नाही. संबंधित ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी (SDM) असे आदेश देतात. ही बाब राहुल गांधींना कशी माहिती नाही, असा सवालही रिजिजू यांनी केला.

राहुल गांधी स्वत:च्याच सापळ्यात अडकले आहेत. त्यांच्याविषयी मला वाईट वाटते. विरोधी पक्षनेत्याने सभागृहात ठोस आणि आशयपूर्ण बोलावे, अशी संसदीय कार्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा असते. यामध्ये ते पूर्णपणे अपयशी ठरल्याने मी नाराज असल्याचेही रिजिजू यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. दरम्यान, राहुल गांधी सापळ्यात अडकल्याचे विधान रिजिजू यांनी का केले असावे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या विधानावरून झालेल्या वादंगाबाबत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पुन्हा एकदा शहांवर निशाणा साधत लाठीचार्जप्रकरणी त्यांनाच दोषी धरले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत त्यांना आधीच माहिती होती, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. अमित शाह यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT