Rahul Gandhi, NavjotSingh Sidhu
Rahul Gandhi, NavjotSingh Sidhu Filoe Photo
देश

सिध्दूंचा राजीनामा अन् राहुल गांधी पत्रकार परिषदेत पोहचलेच नाहीत!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेससमोरील संकट अधिकच गडद होत चाललं आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग दिल्लीत दाखल झाले आहेत. ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येण्याचे टाळले.

पंजाबमधील राजकीय संकटावर पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन राहुल यांनी पत्रकार परिषदेला सामोरे जाण्याचे टाळल्याची चर्चा आहे. या पत्रकार परिषदेत कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमार व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हे दोघे पत्रकार परिषदेत येण्यापूर्वी मुख्यालयात राहुल गांधींना भेटले. तिथे कन्हैया कुमार याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. त्यानंतर कन्हैया व मेवाणी यांचे पत्रकार परिषदेत इतर काँग्रेस नेत्यांनी पक्षात औपचारिक स्वागत केले.

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्याचे नियोजन होते. पण पंजाबमधील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मुख्यालयात असूनही याठिकाणी आले नाहीत. के. सी. वेणुगोपाल, पवन बन्सल, रणदीप सुरजेवाला, नितीन राऊत, हार्दिक पटेल आदी नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता.

दरम्यान, सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT