New Dehli News : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून विरोधी पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या, तरी त्याचा इंडिया आघाडीच्या एकजुटीवर परिणाम होणार नसल्याचा संदेश लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला, तरी इंडिया आघाडीतील त्यांच्या स्थानात कोणताही बदल होणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील इंदिरा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी केली आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडत आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधेयकाला विरोध केला आहे. विधेयकावरील या स्वतंत्र भूमिकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शरद पवारांच्या पक्षाचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवारांबद्दल राहुल गांधी नेमके काय म्हणाले?
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यास इंडिया आघाडीतील त्यांच्या स्थानात बदल होणार का, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, 'इंडिया आघाडीत त्यांचे जे स्थान आहे, ते कायम राहील. त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला, तरी इंडिया आघाडीतील त्यांच्या स्थानात कोणताही बदल होणार नाही.'
डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिका आणि इंडिया आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाचे स्थान या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या उत्तरातून स्पष्ट केले आहे. एखाद्या विधेयकावर राजकीय पक्षांची स्वतंत्र भूमिका असू शकते. मात्र, त्याचा व्यापक राजकीय सहकार्यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे विधेयकावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तरी विरोधकांची आघाडी कायम ठेवण्याचा संदेश राहुल गांधी यांच्या विधानातून मिळाला आहे.