Rahul Gandhi On Manipur  Sarkarnama
देश

Rahul Gandhi On Manipur: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना मोदी-शाहांनी पाठीशी घातले ; राहुल गांधी संतापले..

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : पेटलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय नेतृत्वाने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाठीशी घातल्याचा संशय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. एवढे घडले तरी शाहांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई का केली नाही, त्यांचा राजीनामा का घेतला नाही, असे प्रश्न विचारून राहुल यांनी मणिपूरातील हिंसाचाराला भाजपच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघात केला. मणिपूर हिंसाचार रोखण्यात मुख्यमंत्री पूर्णपणे अशस्वी ठरले, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले.

"भाजपनेच मणिपूरची हत्या केली आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात, पण मोदींना ते कळत नाही, अशी टीका राहुल गांधींना केली. ते म्हणाले, "मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाही, त्यांना मणिपूर जाळायचं आहे,"

"मी मणिपूरमध्ये गेलो तेव्हा मला स्पष्टपणे सांगण्यात आले की, माझ्या सुरक्षेमध्ये कोणी कुकी असेल, तर त्याला इथे आणू नका. आम्ही त्याची हत्या करु. कुठला मैती इथे आणला तर आम्ही त्याला गोळी घालू. त्यामुळे मणिपूर एक राज्य नाही. त्याची दोन भागात विभागणी झाली आहे. राज्याची हत्या करण्यात आली. म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय," असे राहुल म्हणाले.

मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धगधगतंय. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. एन. बीरेन सिंह हेच मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असं दिसतंय. लोकसभेत स्वतः केंद्रीय गृहमंत्री यांनी तसं सूचक वक्तव्य केलं आहे. अमित शाह लोकसभेत म्हणाले, "मणिपूरचे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत आणि सध्या अशा बदलाची गरज नाही,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT